कोल्हापूर : नियाज पटेलने सामना संपण्याअगोदर काही सेकंदांत केलेल्या गोलमुळे पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.शाहू स्टेडियम येथे आज, गुरुवारी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘अ’ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचत एकमेकांच्या गोलक्षेत्रात सातत्याने धडक मारली. सुरुवातीच्या काही मिनिटांत प्रॅक्टिस ‘अ’च्या राहुल पाटीलने जोरदार फटका मारला. मात्र, हा फटका गोलपोस्टला तटून बाहेर आला. पुढच्या क्षणाला प्रतिआक्रमणात पाटाकडील ‘अ’च्या हृषीकेश मेथे-पाटीलने मारलेला जोरदार हेड प्रॅक्टिसचा गोलरक्षक करण शिंदेने हाताने पंच करत बाहेर काढला. पाटाकडील ‘अ’कडून नियाज पटेल, धैर्यशील पवार, प्रशांत नार्वेकर, रूपेश सुर्वे, संजय चिले यांनी अत्यंत वेगवान चाली रचत गोल करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, ते सजग गोलरक्षक करण शिंदे व बचावफळीमुळे निष्फळ ठरले. ‘प्रॅक्टिस’कडून सुशील सावंत, महेश पाटील, हृषीकेश जठार, नीलेश सावेकर, सुमित घाटगे, अविनाश शेट्टी यांनी उत्तम खेळ केला. शेवटपर्यंत सामन्यात दोन्ही संघांना गोल करता आला नसल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागेल, असे प्रेक्षकांना वाटत होते. मात्र, अगदी काही सेकंद उरले असताना पाटाकडील ‘अ’ला कॉर्नर कीक मिळाली. त्यावर व्हेंसेंट कोलॅकोने कॉर्नर कीकद्वारे दिलेल्या पासवर हेडद्वारे नियाज पटेल याने गोल नोंदवत विजय नोंदवला.या विजयाने पाटाकडील ‘अ’ संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. (प्रतिनिधी)
पाटाकडील ‘अ’ उपांत्य फेरीत
By admin | Updated: January 16, 2015 00:13 IST