कोल्हापूर : हिंदूंच्या संरक्षणासाठी यापुढच्या काळात लाठ्याकाठ्या घेऊन मारामाऱ्या करायची गरज नाही, परंतु बुद्धीच्या, लेखणीच्या बळावर या समाजाचे भले करण्यासाठी ‘हिंदू एकता’सारख्या संघटनांची अजूनही गरज आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिरावरील हिंदू एकताच्या सभागृहाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. पाटील म्हणाले, भारत देशाला आपलं मानणारे मुस्लीम बांधव आमचेच आहेत. हिंदू समाज बुरसटलेला नाही. या धर्मातील अनेक प्रथा परंपरांना वैज्ञानिक आधार आहे. नव्या पिढीला हे सर्व समजावून सांगण्याची गरज आहे.
संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम म्हणाले, १९८० साली कोल्हापुरात हिंदू एकताचे काम सुरू केले. त्यावेळी आमच्यावर जातीयवादाचा आरोप झाला. परंतु देशहितासाठी आम्ही काम करत राहिलो. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले. अनेक नेत्यांनी हे सभागृह बांधण्याच्या घोषणा केल्या, परंतु चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच हे सभागृह पूर्ण झाले.
बाबा पार्टे म्हणाले, कोल्हापुरात हिंदू एकताची चळवळ जोमात असताना चंद्रकांत पाटील यांच्यासारखा नेता मिळाला असता तर आम्ही मोठे काम करू शकलो असतो. संसारावर तुळशीपत्र ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी संघटना वाढवल्याचे गजानन तोडकर यांनी सांगितले. यावेळी प्रांत अध्यक्ष विनायक पावसकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, तुषार देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रवि घोरपडे, लाला गायकवाड, सुभाष वडगावकर, चंद्रकांत बराले, संजय साडविलकर, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, दिलीप सूर्यवंशी, अजित तोडकर, सुरेश काकडे, अनिल चोरगे, जयसिंग पाटील उपस्थित होते.
१७०९२०२१ कोल हिंदू एकता
कोल्हापुरात ‘हिंदू एकता’च्या सांस्कृतिक सभागृहाचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी डावीकडून गजानन तोडकर, रवि घोरपडे, नारायणराव कदम, बाबा पार्टे, लाला गायकवाड, सुभाष वडगावकर, चंद्रकांत बराले उपस्थित होते.
छाया नसीर अत्तार