मंगळवारी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागात फेरफटका मारल्यानंतर सर्वसामान्य माणसांची, व्यवसायिकांची जिद्द आणि नव्या उमेदीने उभारण्याची धडपड पहायला मिळाली. अलिशान शोरुमवाल्यांपासून ते झोपडीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांपर्यंत सारेच जण या संकटावर मात करण्याचा प्रयत्न आपापल्या ताकदीवर करत आहेत. महापुराच्या पाण्यात, दुर्गंधीयुक्त गाळात रुतलेला आपल्या संसारोपयोगी साहित्यावर पाणी मारुन तसेच खराब झालेले साहित्य बाहेर काढून आपलं घर निटनेटकं करताना पूरग्रस्त दिसत होते.
दुधाळी, गवत मंडई, उत्तरेश्वर, मस्कुती तलाव, शुक्रवारपेठ, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, सुतारवाडा, न्यू पॅलेस परिसर, पुंगावकर मळा, रमणमळा, शाहूपुरी या परिसरातील सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यांचे अंथरुण पांघरुन, कपडे, धान्य, भांडी, गॅस शेगड्या, मुलांचे शैक्षणिक साहित्य असे बरेच काही महापुराच्या पाण्याने खराब झाले आहे. घरातून एक एक फुटाएवढा गाळ साचून राहिला आहे. तो उपसताना पूरग्रस्तांना नाकीनऊ आले. सहकुटुंब सहपरिवार घर साफ करताना दिसत होते.
शाहूपुरीतील सहाव्या गल्लीत, कुंभारगल्लीत तर सर्वच घरे पाण्यात बुडाली होती. त्याठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी या भागात कुटुंबच्या कुटुंब आपला खराब झालेला संसार रस्त्यावर आणून ठेवत होते. त्यातून जे वाचले, सवरले ते साहित्य फक्त स्वच्छ धुवून घरात नेऊन ठेवत होते. बाकीचे साहित्य मात्र रस्त्यावरच टाकून दिले. या खराब साहित्यातील भंगार गोळा करण्याकरिता काही भंगार विक्रेत्यांनी शाहूपुरीत गर्दी केली होती. भंगारवाल्यांसह महापालिकेची आरोग्य पथके हे साहित्य भरुन नेताना पहायला मिळाले.