कोल्हापूर : दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्णतेसाठी आता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. निव्वळ टक्केवारी नव्हे तर निकालाची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.सचिव गोसावी म्हणाले, आतापर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षेमधील कला आणि वाणिज्य शाखेच्या पेपरचे स्वरूप ८० गुणांची लेखी आणि २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच विज्ञान शाखेतील पेपरचे स्वरूप ७० गुणांची लेखी व ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असे होते. त्यामुळे लेखी परीक्षेत गुण कमी मिळाले तरी प्रात्यक्षिकामधील गुणांच्या जोरावर विद्यार्थी उत्तीर्ण होत होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालातील टक्केवारी वाढत आहे. निव्वळ टक्केवारी नव्हे तर गुणवत्तादेखील वाढावी या उद्देशाने शासनाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याची अट निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कला, वाणिज्य शाखेच्या ८० गुणांच्या पेपरमध्ये १६ आणि विज्ञान शाखेच्या ७० गुणांच्या पेपरमध्ये १४ गुण मिळवावे लागणार आहेत. त्याबाबत शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. फेब्रुवारी-मार्च २०१६ पासूनच्या परीक्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार आहे. (प्रतिनिधी)यंदाचे निकाल उच्चांकी राहतील...लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पुढील वर्षी निकालाची टक्केवारी यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे निकाल पुढील काही वर्षांपर्यंत उच्चांकी राहतील, अशी शक्यता सचिव गोसावी यांनी व्यक्त केली.
उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत मिळवावे लागणार २० टक्के गुण
By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST