कोल्हापूर : महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये एकत्रित राहावे असा ‘एनडीए’ चा धर्म आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमच्यासमवेत राहील, याबाबत आम्ही आशावादी आहोत. आम्ही युतीसाठी अजून विचार करतोय याचा अर्थ शिवसेना कोल्हापूरमध्ये कमकुवत नाही. लढण्यास देखील आम्ही तयार आहोत, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिले. सेनेवर कोल्हापूरकरांचा विश्वास असून तो विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिला. शहराचा विकास, नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली असून पूर्ण बहुमताचे ध्येय असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार राऊत म्हणाले, भाजप, सेनेसह मित्रपक्षांनी निवडणुकांमध्ये एकत्र राहावे असा ‘एनडीए’चा धर्म आहे तशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भाजप आमच्यासमवेत राहील, याबाबत आम्ही आशावादी आहोत. मात्र, आम्ही कमकुवत नाही. प्रसंगी स्वबळावर लढण्यास आम्ही तयार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारी आमदार, जिल्हाप्रमुख या स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र, कोल्हापूर करायचे असेल तर, सेना, भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्टाचारी कामकाज करून शहराचा नावलौकीक धुळीस मिळविला आणि विकासापासून दूर नेले. सामाजिक सुविधांकडे दुर्लक्ष करून शहरवासीयांचा विश्वासघात केला आहे. टोल, पाणी, कचरा उठाव आदी प्रश्नांबाबत आंदोलनांच्या माध्यमातून लढा दिला आहे. त्यातील टोलमुक्तीच्या जवळपास आपण पोहोचलो आहोत. त्यामुळे शहरवासीयांना विश्वास आहे की, सेनेच्या हातात महापालिकेचा कारभार दिला तर, शहराचा विकास होईल. सेनेकडील इच्छुकांची संख्या अधिक आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात इच्छुकांच्या मुलाखती होऊन उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. (प्रतिनिधी)
‘भाजप’बाबत आशावादी, पण लढण्यासही तयार
By admin | Updated: August 24, 2015 00:36 IST