संजय पारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : गोकूळच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील उमेदवार निश्चित करण्यात विरोधी आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. सर्वमान्य उमेदवार देऊन सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आहे. विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी या आघाडीत प्रवेश केल्याने ही अडचण आणखी वाढली. जिल्हा बँक व अन्य सत्तांची सांगड घातली तरच यातून मार्ग निघू शकतो. तुलनेत सत्तारूढ आघाडीत उमेदवारी निवड सोपी झाली आहे.
458 इतके दुसऱ्या क्रमांकाचे सभासद तालुक्यात आहेत. सध्या दोन संचालक आहेत. तीन जागा वाढल्याने त्यातील एक जागा येथे देण्याचे आश्वासन सत्ताधारी आघाडीने या पूर्वीच दिले आहे. त्यामुळे विरोधी आघाडीलाही त्याचे अनुसरण करावे लागणार आहे. आजघडीला येथे सतेज पाटील समर्थक, शिवसेना आ. प्रकाश अबिटकर व राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रबळ दावेदार आहेत. अरुण डोंगळे यांची उमेदवारी निश्चित आहे.
आ. आबिटकर राधानगरी व भुदरगड येथून प्रत्येकी एक अशा दोन जागांचा आग्रह आहे. त्यांचे मतदारसंघातील वर्चस्व पाहता त्यांच्याकडून याबाबत तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी जोरदार तयारी केली आहे. अरुण जाधव, नंदकिशोर सूर्यवंशी हेही इछुक आहेत. राष्ट्रवादीमधून जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील किंवा त्यांच्या पत्नी, तालुका अध्यक्ष किसन चौगले, माजी संचालक फिरोजखान पाटील यांची नावे अग्रेसर आहेत. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्याबरोबर असलेले बिद्रीचे माजी संचालक विजय मोरे, भोगवतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांची प्रबळ दावेदारी आहे. त्यामुळे जागा तीन व दावेदार चार गट अशी स्थिती आहे.
सत्ताधारी आघाडीतून अनेक इछुक असले तरी आ. पी. एन. पाटील यांचा शब्द प्रमाण आहे. अरुण डोंगळे यांच्या विरोधात त्यांच्याच घरात उमेदवारी दिली जाणार हे निश्चित आहे. विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे यांचीही उमेदवारी निश्चित आहे. तिसऱ्या जागेसाठी प्रभाकर पाटील, रविश पाटील, ए.वाय. पाटील यांच्याशी फारकत घेतलेले त्यांचे कट्टर समर्थक राजेंद्र भाटळे यांचे महादेवराव महाडीक यांच्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
.............
शब्द देऊन थांबविले जाणार
विरोधी आघाडीतून चार गटांचे समाधान होणे अशक्य आहे. यातील काहींना सत्ताधारी गटाकडून आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे असे होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सत्ता आल्यास स्वीकृत संचालक, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी, मदत, बिनविरोध निवडीचा शब्द दिला जाऊ शकतो.