आजरा :
उचंगी धरणग्रस्तांच्या बैठकीत चितळे - जेऊर गायरानपैकी संपादित केलेल्या जमिनीमध्ये देय जमिनीची मागणी करायची नाही, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाशिवाय उचंगी धरणाचे काम करण्यास विरोध करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. चाफवडे येथील विठ्ठल मंदिरात चाफवडे, जेऊर, चितळे येथील धरणग्रस्तांची बैठक कॉ. संजय तर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीत संकलन दुरुस्ती, लाभक्षेत्रातील देय जमिनींची मागणी, खासबाब मधील १५० घरांचा मोबदला, घरांची व परसबाग (रिकामी जागा) मूळमालकांच्या नावे राहील याचे हमीपत्र, उजव्या तीरावरील रस्ता या प्रमुख मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय कामास पूर्णपणे विरोध केला जाईल. आधी पुनर्वसन मगच धरण या शासनाच्या धोरणाप्रमाणे लढा उभारण्याचाही निर्धार करण्यात आला.
या बैठकीमध्ये कॉ. संजय तर्डेकर, जयवंत सरदेसाई, चाफवडे सरपंच विलास धडाम, चितळे सरपंच मारुती चव्हाण, निवृत्ती बापट, सुरेश पाटील, संजय भडांगे, रघुनाथ धडाम, प्रकाश मस्कर, विठ्ठल घेवडे, संजय पाटील यांसह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.