कोल्हापूर :ः कुटुंब प्रबोधन आणि विविध संस्थांतर्फे सोमवार (ता.२१) ते रविवार (ता.२७) या कालावधीत योगसप्ताहाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत नोंदणी केलेल्या कुटुंबांना योगासने, प्राणायाम याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे कुटुंबाला एकत्रित योगाभ्यास करता येणार असून अधिकाधिक कुटुंबांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कुटुंब प्रबोधन संयोजक डॉ. बाळकृष्ण होशिंग यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
योगाभ्यासाने शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. मात्र बहुतांशी नागरिकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने योग करता येत नाही. म्हणूनच कुटुंब प्रबोधन या संस्थेने योग सप्ताह ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सोमवार (ता.२१) ते रविवार (ता.२७) या कालावधीत हा योग सप्ताह होणार आहे. या अंतर्गत कुटुंबाने आपल्या घरी एकत्रीत योगाभ्यास करावयाचा आहे. यासाठी कुटुंब प्रबोधन यांनी ४०० गटप्रमुख नेमले आहेत. त्यांना योगप्रशिक्षण दिले असून त्यांनी कुटुंबाची नोंदणी केली आहे. याशिवाय कुटुंबांना ऑनलाइन मार्गदर्शनही केले जाणार आहे.