सुनील चौगले- आमजाई व्हरवडे - (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेत झालेला अपहार आज, सोमवारी उघडकीस आला असून, ग्रामस्थांच्या रेट्याने व ‘लोकमत’च्या दणक्याने आज ग्रामपंचायतच्या बॅँक आॅफ इंडिया, आवळी बुद्रुक शाखेच्या खात्यावर अज्ञाताने आज तेरा लाख पन्नास हजार रुपये जमा केले. त्यामुळे आमजाई व्हरवडे येथे खळबळ उडाली. दरम्यान, आज, सोमवारी बोलावलेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीची कमिटीच बरखास्त करून नवीन निवडणुका घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.आमजाई व्हरवडे येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राधानगरी यांच्या अंतर्गत पेयजल योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी ४९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. १५ ते २० लाख रुपयांचे काम अपूर्ण आहे. सध्या योजनेच्या कामाची सुरुवात झाल्याबरोबर पेयजल योजनेचे बिल ग्रामसभा बोलावूनच देण्याचा ठराव ग्रामसभेत झाला होता; मात्र पहिला तेरा लाख ५० हजारांचा हप्ता सोडला तर उर्वरित रक्कम ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने उचलली. याबाबत पेयजल कमिटीतील १६ पैकी १४ सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. पंचायतीच्या बॅँक खात्यावरून २४ जून २०१४ रोजी संगनमताने परस्पर १३ लाख ५० हजार रुपये उचलले होते. योजनेचे काम अर्धवट असताना रक्कम उचलच कशी झाली? याबाबत तक्रार झाली; मात्र आज अज्ञाताने ग्रामंपचायतीच्या बँकेत खात्यावर साडेतेरा लाख रुपये जमा केले.रक्कम उचलताना गटविकास अधिकारी ग्रामसेवकांकडून पूर्ण काम झाल्याचे लेखी घेऊन कामाची चौकशी करतात. मात्र, या कामाची उचल मागताना ग्रामसेविकेने ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. ४९ लाखांपैकी कंत्राटदारांना ३० लाख रुपये दिले आहेत. मग साडेतेरा लाख रुपये कोणी उचल केले हे बाहेर पडणे गरजेचे आहे. कंत्राटदाराशी संपर्क साधला असता, काम महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले.योजनेच्या कामाबद्दल आज आमजाई व्हरवडेत ग्रामसभा झाली. योजनेच्या निकृष्ट कामाबद्दल ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. योजनेबाबत जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.‘लोकमत’चे अभिनंदनगेले दोन दिवस पेयजल योजनेबाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती मांडून अपहार बाहेर काढून तेरा लाख पन्नास हजार भरण्यास भाग पाडल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.
आमजाई व्हरवडेत ‘पेयजल’चा अपहार उघड--‘लोकमत’चे अभिनंदन
By admin | Updated: November 25, 2014 00:30 IST