जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील शशिकला क्षय रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे रुग्णांना पुरविण्यात येणारे जेवण बंद होत असल्याने राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आज, रविवारी रुग्णालयात जाऊन जोरदार निदर्शने केली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने वरिष्ठ लिपिक विलास भवारी यांच्या तोंडास काळे फासण्यात आले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनला टाळे ठोकले. यानंतर भवारी यांनी रुग्णांना बंद करण्यात येणारे जेवण पुन्हा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.उदगाव (ता. शिरोळ) येथे असणाऱ्या शशिकला क्षय रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची वैद्यकीय सेवेसह अनेक गोष्टीची गैरसोय होत आहे. बिल थकल्याने ठेकेदाराने रुग्णालयाला जेवण न पुरविण्याबाबत सांगितले होते. १ सप्टेंबरपासून रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण स्वत:चे स्वत: आणावे असे कळविले होते. हे वृत्त फौंडेशनचे अध्यक्ष महेश कुंभार, उपाध्यक्ष अजित उपाध्ये, प्रकाश पवार यांना समजताच फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन याबाबत विचारणा केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल या गैरहजर असल्याने वरिष्ठ लिपिक विलास भवारी यांना याप्रश्नी चांगलेच धारेवर धरले. यावेळी कर्मचाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त बनले. डॉ. पटेल यांना बोलविण्याची मागणी केली. त्यांचा संपर्क न झाल्यामुळे कार्यकर्ते संतप्त बनले. भवारी यांच्या तोंडास काळे फासून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनला टाळे ठोकले. योग्य निर्णय होईपर्यंत कार्यकर्ते ठिय्या मारून बसले. यावेळी माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील आंदोलनस्थळी आल्या. त्यांनी भवारी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. नगरसेवक सुनील मजलेकर-पाटील, बंडू ऐनापुरे, सतीश जांगडे, प्रशांत पाटील, सुनील कोळी, विजय चव्हाण, दीपक भोसले, गणेश म्हाळुंगे, सागर माने, संग्राम रजपूत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उदगाव क्षय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार उघडकीस
By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST