शुभम गायकवाड
उदगाव : येथील कुंजवन कोरोना केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. गेल्या मार्चपासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता; परंतु ऑक्टोबरपासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. तालुक्यातील इतर काळजी केंद्रे बंद केली होती; परंतु अखेरीस तालुक्यातील एकमेव असलेले कुंजवन कोरोना केंद्र बंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोरोनाच्या कालावधीत साखळी संसर्गाने शिरोळ तालुक्यात धुमाकूळ घातला होता. तालुक्यात चार हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. कालांतराने ऑक्टोबरनंतर एकूण सहा पैकी पाच केंद्रे बंद करण्यात आली; परंतु कुंजवन केंद्र सुरूच होते. या केंद्राने तब्बल एक हजाराच्या आसपास रुग्णांना सेवा दिली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार, कुंजवन केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल कामते यांच्या नियोजनामुळे येथे रुग्ण दगावण्याची संख्या अगदी नगण्य होती. त्यामुळे जिल्ह्यातील संवेदनशील कोरोना केंद्र अशी याची ओळख होती.
----------
कोट - तालुक्यातील इतर काळजी केंद्रे बंद केली होती; परंतु कुंजवन केंद्र सुरू होते. रुग्णसंख्या अगदीच कमी असल्याने कुंजवन केंद्रही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय दत्तवाड व शिरोळ येथे टेस्टिंगची व्यवस्था अजूनही सुरू आहे.
प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारी
...........
कोट - कुंजवन या देवस्थान ट्रस्टने आपली इमारत कोरोना काळजी केंद्राला देण्याचा निर्णय अगदी अभिनंदनीय होता. या काळजी केंद्रामुळे तालुक्याला त्याचा फायदा झाला. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तमरीत्या रुग्णांना सेवा दिली.
- सागर कदम, संस्थापक ड्रीम फौंडेशन, उदगाव