कोल्हापूर : राज्यात १ एप्रिलपासून पूर्णपणे ऑनलाईनने बांधकाम परवानगी आणि नियोजनाशी संबंधित सर्व बाबी देण्याचे बंधनकारक राहील. यामध्ये महापालिका, नगरपालिकेची सबब ऐकून घेणार नाही, कोणालाही मुभा दिली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती नगरविकासचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी रविवारी दिली. यासाठीचे सॉप्टवेअर तयार केले आहे. बांधकामाचे जुने सुरू असलेले प्रकल्प सुरू राहतील, नवीन कधीही मंजूर करू शकता. जुन्याबाबत मार्गदर्शन सूचना काढू, असेही त्यांनी सांगितले. क्रेडाईच्यावतीने युनिफाईडसंदर्भातील कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
भूषण गगराणी म्हणाले, देशात सर्वांत जलदगतीने नागरीकरण होणारे महाराष्ट्र राज्य आहे. येथे ४५ टक्के लोक नागरी क्षेत्रात राहतात. २०३० पर्यंत याचे प्रमाण ५८ टक्क्यावर जाणार आहे. नगर नियोजन कसे असावे, नियमावली कशी असावी, परवडणारी घरे कशी निर्माण होतील, उद्यान, वाहतूक व्यवस्था कशी असेल ही सर्व आव्हाने स्वीकारून यशस्वी पार पाडायची आहेत. तरच मोठ्या नागरीकरणास चांगली सुविधा देऊ शकू, अन्यथा सर्व बकाल वस्त्या होतील. तसेच मूलभूत सुविधा राहणार नाहीत. मग त्या नागरीकरणाला फारसा अर्थ राहणार नाही.
युनिफाईड या नवीन नियमावलीमुळे सर्व आव्हाने यशस्वीपणे पार पाडू. पुढील २० वर्षांचा सर्वागीण विकासाचा विचार करून ही नियमावली करण्यात आली आहे. युनिफाईडबाबत पूर्ण राज्यात फायदा होईल, असा सूर आहे. महाराष्ट्र वेगाने विकसित होणारे राज्य असून सेवा क्षेत्राचा वाटा ५५ टक्के आहे. यापैकी ३५ टक्के वाटा बांधकाम क्षेत्राचा आहे. हा वाटा वाढला पाहिजे, पण दर्जेदारपणे लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार या विकास नियमावलीमध्ये केला असून सर्वसमावेशक परिपूर्ण डॉक्युमेंट तयार झाले आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरे, शहरात चांगले वातावरण निर्माण व्हावे. महापालिकांना सार्वजनिक सुविधा देता याव्यात हा या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
चौकट
चांगले शहर करून जगाला दाखवून देऊ
युनिफाईड हे एक साधन आहे. सर्वांनी इच्छाशक्ती दाखवली नाही, तर साध्यापर्यंत पोहोचणार नाही. या साधनाचा उपायोग करून साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकत्र या, परिश्रम घ्या. चांगले शहर करणे आवक्यात आहे. ते आपण करू शकतो, हे जगाला दाखवून देऊ, असे गगराणी यांनी आवाहन केले.
चौकट
मंत्री खास मित्र असू नये
क्रेडाईचा राज्याध्यक्ष आणि नगरविकासचा प्रधान सचिव एकाच गावचा असू नयेत. त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर प्रधान सचिवाला त्याच्या गावात येणे मुश्कील होते. हा नवीन धडा घेतला आहे आणि दुसरा धडा म्हणजे मंत्री देखील खास जवळचे मित्र असू नयेत. कारण मंत्र्याला नाही म्हणता येते, मात्र, मित्राला नाही म्हणता येत नाही, असे गगराणी यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
चौकट
एफएसआय मिळतो म्हणून अनियंत्रित बांधकाम नको
बांधकाममध्ये सामान्य लोकांना फायदा आणि कमी त्रास होईल याचा विचार युनिफाईड करताना केला. यामध्ये एफएसआय वाढवला आहे. मात्र, जादा एफएसआय घेऊन अनियंत्रित बांधकाम करू नका, असे आवाहन गगराणी यांनी केले.
फोटो : १७०१२०२१ केएमसी गगराणी न्यूज
ओळी : कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये क्रेडाईच्यावतीने रविवारी नवीन युनिफाईड नियमावलीची कार्यशाळा घेतली. यावेळी नगरविकासचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, नगरविकास विभागातील अधिकारी, क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट