हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील युवराज बाळासो कोरेगावे (वय २९) या युवकाने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
अधिक माहिती अशी की, युवराज हा सकाळी शेतामध्ये उसाची लावणी करण्यासाठी गेला होता. दुपारी घरी येऊन त्याने आपल्या घरातील पहिल्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हते. आई कामानिमित्त गावामध्ये गेली होती. आई घरी आल्यावर युवराजने आत्महत्या केल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी घरांमध्ये जाऊन पाहिल्यानंतर युवराजने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. युवराजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. लग्न होत नसल्याने नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी होती. तो शेतातील घरात आईसह राहत होता. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळी हातकणंगले पोलीस दाखल होऊन त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथे पाठविला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.