कुरुंदवाड : येथील नवबाग रोडवर असलेल्या सोनाली ड्रायक्लिनिंगमध्ये आलेल्या कपड्यात तीन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट आढळून आले. त्यामुळे ड्रायक्लिनिंगचे मालक हरीबा कुंभार यांनी कपडे कलगोंडा पोमाजे यांचे असल्याने कुंभार कुटुंबाने ब्रेसलेट प्रामाणिकतेने परत दिल्याने पोमाजे कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.
याबाबत माहिती अशी की, पोमाजे यांनी दोन दिवसांपूर्वीच कपडे ड्रायक्लिनिंगसाठी हरिबा कुंभार यांच्याकडे दिले होते. कपड्यातील खिशांमध्ये सोन्याचे ब्रेसलेट होते. पोमाजे कुटुंब ब्रेसलेट सापडत नसल्याने शोधाशोध करत होते. याचवेळी कुंभार यांनी कपडे ड्रायक्लिनिंगला घेतले असता ब्रेसलेट सापडल्याने पोमाजे यांच्या घरी जाऊन परत केले.
सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट सापडल्याने पोमाजे यांचा जीव भांड्यात पडला. यावेळी त्यांनी हरिबा कुंभार, तानाजी कुंभार, उदय कुंभार आणि नामदेव सोनवणे यांचा सत्कार करून बक्षीस म्हणून काही रक्कमही दिली; मात्र कुंभार कुटुंबाने बक्षिसाची रक्कम नाकारली. त्यामुळे कुंभार कुटुंबाच्या प्रामाणिकतेचे शहरात कौतुक होत आहे.
फोटो - १९०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे कलगोंडा पोमाजे दाम्पत्याने कुंभार कुटुंबाचा सत्कार केला.