संतोष पाटील - कोल्हापूर महापालिकेतील घरफाळा घोटाळ्याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नास माहिती देण्यासाठी मुंबईस गेलेल्या अधिकाऱ्यांनी जाताना कर्मचाऱ्यांकडून तब्बल ६० हजारांची वर्गणी गोळा केल्याच्या प्रकाराची महापालिकेत जोरदार चर्चा सरू आहे. चौकशीच्या आगीतही हात शेक त ‘चोरावर मोर’ होऊन मुंबईत ‘दिवा’ लावलेल्या अधिकाऱ्यांचे किस्से रंगवून सांगितले जात आहेत.बागल चौकात असणाऱ्या एका व्यापारी व नागरी वापरात असलेल्या संकुलाचा तब्बल २२ लाख रुपयांच्या थकीत घरफाळ्यास १२ लाख रुपयांची बेकायदेशीर सूट दिल्याचा प्रकार ९ एप्रिल २०१५ रोजी उघड झाला. चौकशीअंती दोघांची वेतनवाढ रोखली. यावर हे प्रकरण मिटले, असे वाटत असतानाच आयुक्तांनी पुन्हा मागील चार वर्षांतील शून्य घरफाळा किंवा अशा प्रकारे सूट दिलेल्या मिळकतींची शोधमोहीम सुरू केली. यातून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची रक्कम २७०० मिळकत धारकांच्या खात्यांवर दिसून आली. ‘हा घोटाळा नाहीच; ही तर संगणकीय चूक’ अशी सारवासारव करीत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. आयुक्तही दैनंदिन कामांत व्यस्त असल्याने घरफाळा घोटाळ्यावर पडदा पडल्याचेच चित्र आहे. संबंधितांनंी घोटाळ्याच्या आगीवर चौकशीचे पाणी मारत प्रकरण विझविण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र, त्याचा धूर आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निघू लागला आहे. यानंतर घरफाळा हा हिमनगाचे एक टोक असल्याचे पुढे येण्यास मदत होणार आहे. या घोटाळ्याबाबत उपस्थित होणाऱ्या तारांकित प्रश्नाची इत्थंभूत माहिती देण्यासाठी घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांनी गेले दोन दिवस मुंबईवारी केली. वास्तविक हा सर्व कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. मुंबईला येण्या-जाण्यासह खर्चाचे नियमानुसार पैसे संबंधितांना महापालिकेकडून मिळणार आहेत. मात्र, तारांकित प्रश्नाची भीती घालत, वर्गणीच्या रूपाने पुन्हा हात ओले करण्यात आले. ‘तुम्ही करा घोटाळे, आम्ही बसतो हेलपाटे मारत’ असा दम देत विभागातील ६० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे मुंबईवारीच्या खर्चासाठी वर्गणी काढण्यात आली.
मुंबईवारीसाठी अधिकाऱ्यांनी काढली ६० हजारांची वर्गणी
By admin | Updated: July 17, 2015 00:35 IST