कोवाड : गेले वर्षभर गाजत असलेल्या निट्टूर (ता. चंदगड) येथील तलाठी व कोतवालाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्याने केवळ तक्रादारांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस देऊन स्वत: मात्र चौकशी दिवशीच दांडी मारली. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे चौकशी अधिकारी माणगावचे मंडल अधिकारी व्ही. आर. आरगे यांचीच चौकशी करण्याची मागणी निट्टूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणाने निट्टूर ग्रामस्थ संतप्त बनले आहेत.येथील तलाठी सावाप्पा लांडगे व कोतवाल शिवाजी पाटील मनमानी कारभार करून सर्व ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याने त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे कोवाड विभागप्रमुख विश्वास लक्ष्मण पाटील, शाखाप्रमुख रमेश मारुती पाटील व उपशाखाप्रमुख संतोष कृष्णा कांबळे यांनी २५ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर २०१४ रोजी चौकशीसाठी माणगावचे मंडल अधिकारी व्ही. आर. आरगे यांची निवड केली व यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. यानंतर श्री आरगे यांनी निट्टूरचे तलाठी, कोतवाल यांच्यासह तक्रारदार व ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांना ८ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ११ वाजता निट्टूर गावचावडी येथे चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे लेखी पत्र पाठवले. त्यानुसार तक्रारदार रमेश पाटील, विश्वास पाटील, संतोष कांबळे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक गावचावडीत वेळेत उपस्थित राहिले. मात्र, यावेळी दिवसभर स्वत: चौकशी अधिकारी व्ही. आर. आरगे, तलाठी सावाप्पा लांडगे, कोतवाल शिवाजी पाटील दुपारपर्यंत गावचावडीकडे फिरकलेच नाहीत. केवळ चौकशी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दिवसभर तिष्ठत बसून राहावे लागले. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न स्वत: चौकशी अधिकारीच करत आहे. यासंदर्भात चुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्याची शक्यता असल्याने या चौकशी अधिकाऱ्यांचीच चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर रमेश पाटील, विश्वास पाटील, संतोष कांबळे यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)नेमकी चौकशी कोणाची करणार?चौकशी अधिकारीच गायब झाल्याने नेमकी कोणाची चौकशी करावी, हा प्रश्न उपस्थितांना पडला. चौकशी अधिकारीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. चौकशी अधिकारी व्ही. आर. आरगे अनुपस्थित राहिल्याने निट्टूर ग्रामपंचायतीनेही याची गांभीर्याने दखल घेतली असून, या अधिकाऱ्याचीच चौकशी करण्याची तक्रार चंदगड तहसीलदारांकडे केली आहे.
अधिकाऱ्याचीच चौकशीला दांडी
By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST