रत्नागिरी : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. चिपळूण आणि दापोली याठिकाणी विभागीय स्तरावर आजपासून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात कृषी खात्यात एकूण १८०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी २१३२ पदे अद्याप रिक्त आहेत. संघटनेकडून वारंवार निवेदन, आंदोलने करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारा घटक, कृषी कर्मचारीच विविध मागण्यांपासून वंचित आहे.मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांनी कालपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात जिल्हा कृषी विभागातील तांत्रिक संवर्ग सहायक, कृषी पर्यवेक्षक, अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-१ आणि - २, अधीक्षक, सहसंचालक, संचालक मिळून ४०० जणांचा तसेच शेतकऱ्यांचाही सहभाग आहे.या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर व्यापक स्वरूपात १६ आॅक्टोबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला प्रारंभ करणार असल्याचे कृषी सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आरीफ शहा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या जोडीला कर्मचाऱ्यांची साथ
By admin | Updated: August 12, 2014 23:22 IST