लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांमध्ये देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील तीन मंत्राच्या शिफारस पत्रालाही केराची टोपली दाखवली जात आहे. या कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, यात मंजूर पदसंख्या ३,९१४ आहे. त्यापैकी २,५९२ पदे भरली असून, १,३२२ पदे रिक्त आहेत.
गतवर्षी कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या बदल्या करण्याचे काम सध्या सुरु असून, यामध्ये प्रत्येक पदासाठी दर ठरले होते. त्यानुसार ज्यांनी ठरलेले पैसे दिले त्यांच्याच बदल्यांचे प्रस्ताव करुन ऑर्डर काढण्यात आली आहेत.
यासाठीची साखळी ही कार्यालयातील मुख्य प्रशासकीय ‘भावना’पासून सूरु होते. शशीपासून बीडाच्या भाल्यापर्यंत चार ते पाचजणांची यंत्रणा कामाला लागते. ऑर्डर येण्याअगोदरच पैशासाठी या यंत्रणेचा तगादा सुरु होतो. चष्मेवालाही त्यात सहभागी असतो.
चालक बदलासाठी ५० हजार रुपये दर निश्चित झाला होता, मात्र त्या बदल्याच रद्द झाल्याने केलेल्या कामावर पाणी फिरले. शिपाई व लिपिक पदासाठी ४० ते ५० हजार रुपये, टेक्निशियन पदासाठी ६० ते ७० हजार रुपये त्याचबरोबर परिचारिका बदल्या व पदोन्नतीसाठी ७० ते ७५ हजार रुपये असे दर ठरल्याची उघडपणे चर्चा सुरु आहे.
याच यंत्रणेकडून विनंती बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांना जिल्ह्य़ातील मंत्र्यांचे शिफारस पत्र आणायला सांगितले जाते. मात्र, त्या पत्राला केराची टोपली दाखवत ठरल्याप्रमाणे दर काढून वसुली केल्याचे समजते. जे कर्मचारी पैसे देण्यासाठी तयार झालेत, त्यांचेच प्रस्ताव तयार करून आरोग्य संचालकांना सादर करून त्यावर सह्या घेऊन ऑर्डर काढण्यात आल्या. पुण्यात सही झाल्याबरोबर दुसऱ्या मिनिटापासून कोल्हापुरातील यंत्रणा वसुलीला लागली.
‘उत्तम’ पद्धतीने फोन..
ऑर्डरवर सही झाली की कार्यालयातून उत्तम पध्दतीने फोन केला जात होता. ऑर्डर तयार झाली आहे. आजच्या आज तयार ठेवा, असे फोन करून सांगितले जात होते. त्यानंतर प्रमुख जाऊन वसुली करत होते.
पैसेवाल्याचेच काम..
ज्या कर्मचाऱ्यांविषयी वारंवार तक्रारी आहेत, ज्यांची सहा वर्ष पूर्ण झाली आहेत, अशा कर्मचाऱ्यांची बदली केली जात नाही किंवा त्यांना विचारलेही जात नाही. कारण त्याच्याकडून पैसे मिळत नाहीत.
अजून पदोन्नती शिल्लक..
या बदल्यांनंतर कार्यालयांतर्गत शिपाई ते कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते सहाय्यक अधीक्षक ते अधीक्षक अशी पदोन्नती शिल्लक असून, यात शिपाई ते कनिष्ठ लिपिकसाठी शहरात हवे असल्यास १ लाख रुपये दर असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ही प्रक्रिया चालू आठवड्यात होत आहे.