सांगली : जिल्ह्यातील पाच जागांवर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी जिल्ह्यात सैनिकांपेक्षा पदाधिकाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून सभासद नोंदणीच झाली नसून, अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दुसरीकडे पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध प्रकारच्या सेलच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात पदांची खैरात वाटण्यात आली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसह संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच जागांवर दावा केला आहे. या जागांवर सक्षम उमेदवाराचा शोधही एका बाजूला चालू आहे. पाच जागा मिळाल्या तरी त्याठिकाणी बाहेरचेच उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षावर येण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन-चार वर्षात सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा कारभार गोगलगाय गतीने सुरू आहे. नवे कार्यकर्ते तयार करणे किंवा सभासद नोंदणीच्या माध्यमातून पक्षीय ताकद वाढविण्याची कोणतीही तसदी घेतली गेली नाही. दुसरीकडे अनेक पक्षीय सेलच्या माध्यमातून पदांची खैरात वाटण्यात आली. युवा सेनेबरोबरच विद्यार्थी सेना, महिला आघाडी, विमा कामगार, उद्योग सेल, एस. टी. अशा अनेक सेलचे पदाधिकारी आहे. जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख पदांपासून शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख आणि त्यांचेही उपप्रमुख अशी पदांची लांबलचक यादी आहे. जेवढी पदे आहेत, त्याहून अधिक पदांचे वाटप जिल्हाप्रमुखांनी केले आहे. एकीकडे पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत असताना सांगली जिल्ह्यात किती सभासद आहेत, याची माहिती खुद्द जिल्हाप्रमुख संदीप सुतार यांना नाही. आता विधानसभेच्या निमित्तानेच सभासद नोंदणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून सभासद नोंदणी ठप्प आहे. संपर्कप्रमुख किंवा राज्यातील मोठ्या नेत्यांसमोर पदाधिकाऱ्यांचीच गर्दी करण्याचा फंडा येथील मुख्य पदाधिकाऱ्यांनी निवडला आहे. आंदोलनांसाठीही कार्यकर्ते मिळणे मुश्किल झाले आहे. ४पक्षात नव्याने येत असलेल्या अन्य पक्षांतील नेत्यांना येथील पदाधिकाऱ्यांचा कारभार पसंत नसल्याने ते थेट राज्यातील प्रमुखांशी संपर्क साधत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी अशा बाहेरून येणाऱ्या किंवा आलेल्या नेत्यांचा संवादच होत नसल्याचे चित्र आहे. हे सर्व पदाधिकारी राजकीय क्षेत्रात कनिष्ठ असल्याने त्यांच्याशी संवाद टाळला जात आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे एकूण सभासद किती आहेत, याबाबत सुतार यांना विचारणा केली असता, सभासद नोंदणी आताच सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकृत सभासदांची संख्या नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीतील शिवसेनेचे सतत रिकामे असणारे जिल्हा कार्यालयच कार्यकर्त्यांच्या संख्याबळाची स्थिती दर्शवून देत आहे.
सैनिकांपेक्षा पदाधिकारीच उदंड
By admin | Updated: August 7, 2014 00:21 IST