कोल्हापूर : कपिलतीर्थ भाजी मंडईचे नूतनीकरण करून आम्हास विस्थापित करू नका. शहराच्या मध्यवस्तीतील ही जागा बिल्डरांच्या घशात घालू नका, अशी मागणी करीत आज, शुक्रवारी तीनशेहून अधिक भाजीविक्रेत्यांनी महापालिकेला घेराव घातला. तसेच ‘बीओटी’ प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विक्रेत्यांनी प्रत्येक नगरसेवकास निवेदन देत गाऱ्हाणे मांडले.शहराच्या मध्यवस्तीत महाद्वार रोडनजीक असलेले कपिलतीर्थ मार्केट हे शेतकरी व भाजीविक्रेत्यांना अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी मार्केट येथे बंदिस्त जागेत भाजी विक्र ीचा प्रयोग फसला आहे. येथील व्यापारी संकुलांमुळे पाचशेहून अधिक भाजीविक्रेते व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कपिलतीर्थ मार्केटचे नूतनीकरण करू नका, या मागणीसाठी भाजीविक्रेत्यांनी महापालिकेत धडक दिली.नूतनीकरणानंतर भाजीसारखा नाशवंत पदार्थ अंधाऱ्या जागेत विकण्याची वेळ विक्रेत्यांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे पाचशेहून अधिक भाजी विक्रेत्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाजी मार्केटप्रमाणे कपिलतीर्थ येथे व्यापारी संकुल झाल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनाही रस्त्यावरच व्यवसाय करावा लागेल. याची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन भाजी विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे नगरसेवकांना केले.यावेळी कपिलतीर्थ भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष विलास मेढे, सागर पोवार, विलास निकम, संदीप पोवार, प्रदीप इंगवले, रवींद्र आंबेकर, पिंटू जाधव, मनोज जाधव, आदींसह भाजीविक्रेते उपस्थित होते.
भाजीविक्रेत्यांचा घेराव
By admin | Updated: November 28, 2014 23:42 IST