जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व पुरूष सरपंचपद आरक्षण निश्चित झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ३३ पैकी १७ गावांत महिला सरपंच म्हणून विराजमान होणार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर आता इच्छुकांचे लक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही दिवशी लागतील, हे गृहीत धरून तालुक्यात उमेदवारांच्या चाचपणीबरोबरच गटातटाची फेर जुळवाजुळव सुरू झाली आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची किनार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कितपत दिसून येणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे. गोकुळ व केडीसीसी निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. केंद्र व राज्य पातळीवर भाजप व शिवसेना एकत्र आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींत दोन्ही पक्षांची ताकद वाढविण्यासाठी या पक्षातील नेते व पदाधिकारी कशी व्यूहरचना आखतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीपक्षांतर्गत असणारे सा. रे. पाटील गट, यड्रावकर गट, माने गट, आवाडे गट तसेच शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी व स्वाभिमानी यांची याची राजकीय रणनीती कशी ठरणार याबाबतही उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गट पातळीवर होत असतात. मात्र, शिरोळ तालुक्यातील राजकारण अतिशय संवेदनशील बनले असल्याने तालुका पातळीवरील नेते या निवडणुकीत नक्कीच लक्ष घालतील असेच चित्र आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे कोणत्याही दिवशी निवडणुका जाहीर होतील, असे गृहीत धरून तालुक्यातील ३३ गावांत राजकीय हलचाली गतिमान झाल्या आहेत. प्रभागात सक्षम उमेदवार देण्याबरोबरच सत्ता कशी काबीज करता येईल, यासाठी गुप्त बैठकांना जोर आला आहे. ५० टक्के महिलांचा समावेश असल्याने महिला राज सर्वच गावांत दिसून येणार आहे. कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी लागणारी कागदपत्रांची जमाजमव करण्यास सुरूवात केलेली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणारी मंडळी गटनेत्यांचे हुंबरे झिजवत आहेत. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले आहेत.निवडणूक होणाऱ्या ३३ पैकी १७ महिला वर्गाकडे सरपंचपद निश्चित झाले आहे. आरक्षण सोडतीमुळे या गावातील इच्छुक पुरूष उमेदवारांची मोठी निराशा झाली. असे असले तरी आपल्या सौभाग्यवतींना या निवडणुकीत उतरविण्यासाठी पतीराजाकडून आत्तापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सरपंचपद आरक्षण निश्चितीमुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकिय ईर्षा पेटणार आहे. (प्रतिनिधी)३३ ग्रामपंचायतींची निवडणूकसरपंच पदाची लॉटरी फुटल्यानंतर निवडणुकीच्या आचार संहितेकडे ३३ गावांचे लक्ष्य लागून राहिले आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये या ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. जुलै महिन्यात निवडणुका जाहीर होतील, असेही संकेत मिळत आहेत. यामुळे ती शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
आता लक्ष्य निवडणूक तारखेकडे
By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST