दीपक जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खून, बलात्कार, बाॅम्बस्फोट यासारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच मातृत्व, पितृत्वाची खात्री पटविण्यासाठी करावी लागणारी डीएनए चाचणी आता कोल्हापूरमध्ये सुरू होत आहे. ताराराणी चौकातील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत गुरुवार (१५ जुलै)पासून ही चाचणी सुरू होणार आहे. याचा फायदा कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पोलिसांना होणार आहे.
मुंबईतील २६/११च्या बॉम्बस्फोटांमधील जिवंत दहशतवादी कसाब समुद्रमार्गे ज्या कुबेर बोटीमधून आला होता, त्या बोटीमध्ये त्याचे जॅकेट व ब्लॅंकेट राहिले होते, तेथून ते पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सॅम्पल तपासणीत कसाबच्या घामावरुन हे दहशतवादी या बोटीमधून आल्याचे डीएनए चाचणीद्वारे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी डीएनए चाचणी महत्त्वाची समजली जाते. सध्या या चाचणीसाठी पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत जावे लागत होते.
केंद्र शासनाच्या निर्भया योजनेंतर्गत कोल्हापूरमध्ये ५३.७० लाखांच्या निधीतून डीएनए तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. कोल्हापूर विभागातील सुमारे चारशे गुन्ह्यांतील चाचण्या दरवर्षी पुणे येथे पाठविण्यात येतात. त्यामुळे तेथून अहवाल येण्यास विलंब होत होता. तिथे कामाचा ताण वाढला आहे. कोल्हापूरमध्ये प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असल्यामुळे येथे केंद्र शासनाच्या निधीतून पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पुणे येथून दिलेल्या चाचण्यांचा अहवाल येण्यास वेळ लागत होता. त्यामुळे पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होत होता. आता कोल्हापूरमध्ये ही चाचणी सुरू होत असल्याने तपासाला गती मिळणार आहे.
-----------
गंभीर गुन्ह्यांची उकल करणे, मातृत्व, पितृत्व सिद्ध करणे यासाठी डीएनए चाचणी हा अतिशय परिणामकारक पुरावा मानला जातो. ही चाचणी कोल्हापुरातील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सुरू करण्यात येत असून, त्याचा कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यांतील पोलीस दलांना फायदा होणार आहे.
डाॅ. कृष्णा कुलकर्णी
संचालक,
न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई.
---------