कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ अंतर्गत असणाऱ्या रत्नागिरी-कोल्हापूर विभागातील तीन तालुक्यांतील ११ गावच्या २२० एकर जमिनीच्या संपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. २१ दिवसांच्या आता संबंधित जमीनमालकांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ६ यांच्याकडे आक्षेप नोंदवता येणार आहेत.
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत गेली दोन वर्षे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून यातील एक भाग म्हणून आता २२० एकरांसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दोन आणि चार पदरी रस्ता, पेव्हिंग ब्लॉक्स, रुंदीकरण या कामासाठी ही जमीन आवश्यक असल्याचे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. केर्ले येथील गायरान, केर्ली येथील गायरान, मुलकी पड, शिये येथील स्मशानभूमी देखील यामध्ये संपादित करण्यात येणार आहे. उर्वरित सर्व जमीन ही शेतजमीन आहे. ज्यांना याबाबत आक्षेप घ्यायचे आहेत त्यांना लिखित स्वरूपात आपले आक्षेप नोंदवता येणार आहेत. तसेच व्यक्तिगतरीत्या किंवा वकिलांमार्फतही बाजू मांडता येणार आहे. त्यासाठी अवधी दिला जाणार आहे. अशा सर्व आक्षेपांबाबत संबंधितांची बाजू ऐकल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे हे आक्षेप स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ६ यांनी राखून ठेवला आहे.
चौकट
या गावांतील जमीन होणार संपादित
करवीर तालुका भुये, भुयेवाडी, जठारवाडी, केर्ले, केर्ली, निगवे दुमाला, पडवळवाडी, शिये
पन्हाळा तालुका कुशिरे, सातवे
शाहूवाडी तालुका जाधववाडी