कोल्हापूर : शहर वाहतूक शाखेचे काही पोलीस वाहनधारकांची अडवणूक करून पैसे उकळतात. त्यानंतर साध्या कागदावर सही करून त्याची पावतीही दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनाने या ‘पास’मधून खाबुगिरीच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ‘त्या’ पोलिसांची चौकशी सुरू असून, लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांच्या नाहक अडवणुकीचे प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद सर्वच वाहतूक शाखेतील पोलिसांना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली.शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक करून एंट्री पास दिला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवार (दि. २६)च्या अंकात प्रसिद्ध झाले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेतील पोलिसांची झाडाझडती घेतली. या प्रकारातील दोषींना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या वाहनधारकास पास दिला, त्याची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. वाहनधारकांकडून लेखी तक्रार घेऊन, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर लवकर कडक कारवाई केली जाणार आहे. असा प्रकार घडल्यास नागरिकांनी तसेच वाहनधारकांनी शहर वाहतूक कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा प्रवृत्तींवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘त्या’ पोलिसांना नोटिसा
By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST