पेठवडगाव : आरक्षित प्रभागातील प्रश्न पाच वर्षे दुर्लक्षित ठेवण्यात आले आहेत. उघड्यावर मांस विक्री, वाहतूक कोंडी, शौचालयांचा निधी अन्यत्र वर्ग केल्यामुळे अनेक नागरिकांची शौचालयांचे बांधकामे अर्ध्यावर आहेत, अशा आरोपांच्या फैरी सत्ताधारी नगरसेवक कालिदास धनवडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडत प्रशासनास धारेवर धरले. आठ दिवसांत प्रश्न न सुटल्यास पालिकेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला. वडगाव पालिकेची सर्वसाधारण सभा महालक्ष्मी मंगलधाम येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. ३१ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
कालिदास धनवडे यांनी आपल्या प्रभागातील प्रश्न ताकदीने मांडण्याचा प्रयत्न केला. धनवडे यांनी आंबेडकर चौकातील मासांहार विक्री बंद करावी, तसेच आंबा रोडवरील रस्त्यांवर भरत असलेल्या मत्स्य विक्रीवरदेखील बंदी घालून व्यापाऱ्यांना अन्यत्र स्थलांतर करावे. आरक्षित जागेवर उद्यान विकसित करावे. शौचालयाचे अनुदानही थकले आहे. त्यामुळे शौचालये अर्धवट राहिलेले आहेत. प्रभागातील निधी अन्यत्र वळविला. त्यांना मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी आवश्यक ती कार्यवाही, बांधकाम परवाने तपासण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. यास आक्षेप घेऊन वरवरची कार्यवाही सांगू नका. आमची कामे न झाल्यास आठ दिवसांत पालिकेवर मोर्चा आणू, असा इशारा दिला. यावेळी नगराध्यक्ष माळी यांनी चुकीचे आरोप करू नका. शासकीय निधी मिळालेला नसल्यामुळे अनुदान दिलेले नाही, असा खुलासा केला.
उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी महालक्ष्मी तलावाच्या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. वीज वितरण कंपनीचे डीपी रस्त्यावर आहेत. त्यावर भाडे आकारणी करावी, अशी मागणी केली, तर संदीप पाटील यांनी अश्वारूढ पुतळा कमिटी सर्वसमावेशक करावी, अशी मागणी केली.
बुलेट फायर फायटरच्या किमतीत तफावत असल्याकडे संदीप पाटील यांनी लक्ष वेधले. यास अजय थोरात यांनीही खात्री करून बिल द्यावे, अशी मागणी केली. यावेळी संबंधित कंपनीकडे खुलासा मागितला असल्याचे सांगितले.
चर्चेत उपनगराध्यक्ष गुरुप्रसाद यादव, संतोष चव्हाण, अजय थोरात, संदीप पाटील, शरद पाटील, संतोष गाताडे आदींनी भाग घेतला.
शहरातील वारसास्थळे यादी निश्चित करण्याचा ठराव प्रलंबित ठेवण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून २० लाखांची विकासकामे, तर जैन समाजास गट नंबर १७३ मधील जागा स्मशानभूमी, उत्कर्ष सामाजिक सेवाभावी मंडळ, सणगर समाजासाठी अभ्यासिका व सांस्कृतिक हाॅलसाठी, रामभक्त शैक्षणिक सामाजिक मंडळास रामनगर येथे प्रवेश कमानीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी गटनेत्या प्रविता सालपे, सुनीता पोळ, अलका गुरव, नम्रता ताईगडे, मैमून कवठेकर, शबनम मोमीन, सावित्री घोटणे आदी उपस्थित होत्या.
चौकट: शंखध्वनीची वेळ आणू नका : कालिदास धनवडे
गतवर्षी सानुग्रह अनुदानाच्या प्रश्नावर काही कर्मचाऱ्यांनी दिवाळी दिवशी शंखध्वनी केली होता. अशी आठवण सांगून अशी वेळ पुन्हा कर्मचाऱ्यांवर आणू नका. कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत तेवढे सानुग्रह अनुदान द्या, अशी मागणी कालिदास धनवडे यांनी केली.