रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य सरकारने मदत म्हणून देऊ केलेल्या २०० कोटी रुपयांमधून ६९ कोटी ८५ लाख रुपये आंबा, काजू उत्पादकांना मिळणार आहेत. मात्र, कोकणातील उत्पादकांना भरपाई नको, त्यापेक्षा कर्जमाफी द्यावी, असा घरचा आहेर भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी सरकारला दिला आहे. ही मागणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मंगळवारी राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्यांसाठी २०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. कोकणातील चार जिल्ह्यांच्या वाट्याला त्यातील ६९ कोटी ८५ लाख रुपये येणार आहेत. ही भरपाई पुरेशी नाही. प्रशासकीय स्तरावरून चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे कोकणावर अन्याय होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.राज्य सरकारने २०० कोटी रुपये कर्जमाफी द्यावी आणि उर्वरित कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षांची मुदत मिळावी. त्यावरील व्याज माफ व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी सरकारसमोर ठेवली आहे. आंबा किंवा काजूला क्षेत्रावर आधारित नुकसानभरपाई देऊ नये, असा मुद्दाही मांडला आहे. त्यावरही जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)५५० कोटी रुपयांचे कर्जरत्नागिरी जिल्ह्यात २२ हजार आंबा, काजू बागायतदारांनी ३५० कोटी, तर सिंधुदुर्गातील बागायतदारांनी १९५ कोटी असे ५५० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांकडून हा कर्ज पुरवठा झाल्याची माहिती कृषी खात्याकडेही उपलब्ध आहे.मात्र, केवळ अवकाळी पाऊसच नाही, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ७० टक्के पीक हातचे गेले आहे. त्यामुळे या ५५० कोटी कर्जांपैकी २०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली, तरच रत्नागिरी-सिंधुदुर्गातील बागायतदारांना दिलासा मिळू शकेल, असे ते म्हणाले.
भरपाई नको, कर्जमाफी द्या
By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST