नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला सहा-सहा महिने उपनगराध्यक्षपद देण्याचे पक्षाचे धोरण ठरले होते. पक्षप्रतोद पदाची जबाबदारी पार पाडणारे भरत लठ्ठे यांना संधी दिली होती. दोन वर्षे झाली तरीही त्यांनी आपल्या दोन्हीही पदाचा राजीनामा दिला नाही. परिणामी इतर नगरसेवकांमधून असंतोष वाढीस लागला होता. त्यामुळे माजी आमदार सुरेश हाळवणकर, ज्येष्ठ नेते महावीर गाट, इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांना दोन्ही पदांपैकी एका पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते तरीही वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेला त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वाटाण्याच्या अक्षता लावण्याचीच कृती केली आहे. पक्षाच्याच नगरसेविका सुप्रिया पालकर, लक्ष्मी साळोखे व ऋतुजा गोंधळी यांचे नगरसेवक पद अपात्र होण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याची भावना या नगरसेविकांची झाली आहे. परिणामी आठ दिवसांपूर्वी या नगरसेविकांनी लट्ठे यांच्यावर नाहक त्रास करत असल्याचा आरोप करत त्यांच्या घरावर धडक देत बांगड्यांचा आहेर करण्याचा इशारा दिला होता. अशाप्रकारे सुरू असणाऱ्या या सत्तासंघर्षाचा शेवट करण्याचा व उपनगराध्यक्ष तसेच पक्षप्रतोद पदावरून लठ्ठे यांची उचलबांगडी करण्याचा निर्धार महावीर गाट व अमित गाट यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतला आहे. त्यासाठी भाजपच्या सहा व कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांची एकत्रित मोट बांधून हा अविश्वास ठराव उद्या सोमवारी नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहे.
भरत लठ्ठे विरोधात आज अविश्वास दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST