कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आता बराच कमी झाला असून, शुक्रवारी केवळ १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. संसर्ग, नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या १८ पैकी १४ कोविड सेंटर्स बंद केली आहेत. कोल्हापूर शहराच्या दृष्टीने ही एक समाधानाची बाब मानली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने कोविडविरुद्धच्या लढाईत आघाडी घेतली आहे. एकीकडे कोविड रुग्णांवर योग्य उपचार करण्याबरोबरच लसीकरणाची मोहीम देखील व्यापक केली आहे. पहिला व दुसरा डोस मिळून तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले.
कोल्हापूर शहरात शुक्रवारी केवळ १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा संसर्ग वाढला होता तेेव्हा नवीन रुग्णांची संख्या साडेचारशे ते पाचशेच्या घरात पोहोचली होती. त्या तुलनेत आता संसर्ग खूपच कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेत १८ कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली होती, त्यातील आता १४ कोविड सेंटर्स बंद करावी लागली आहेत. सध्या केवळ चारच सेंटर्स सुरू असून, तेथे ६१ रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व सेंटर्समधून उपचार घेऊन आतापर्यंत १० हजार ७९५ रुग्ण बरे झाले.
महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत.