अब्दुललाट : केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने हागणदारीमुक्त गाव अभियान सर्वत्र जोरदारपणे राबविले जात आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन ही मोहीम फत्ते करण्यासाठी निकराचा प्रयत्न करीत आहे. गतवर्षी निर्मलग्रामच्या केंद्रीय कमिटीने निर्मलग्रामपासून वंचित असलेल्या गावांची तपासणी केली होती. अब्दुललाट हे त्यापैकी एक गाव. शिरोळ पंचायत समितीच्या प्रशासनाने हे गाव निर्मल होण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले; पण व्यर्थ. अब्दुललाट अजूनही निर्मलग्रामपासून काही कोस दूरच राहिले आहे.याच पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत अब्दुललाट येथे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध कर्मचारी, पदाधिकारी, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांची गाव निर्मल होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये निर्मलग्रामसाठी अडसर ठरलेल्या शौचालयापासून वंचित असलेल्या लोकांमध्ये जाऊन प्रबोधन करणे, शासनाच्या सवलतींचा लाभ घेणे याविषयीची माहिती दिली.ग्रामविकास अधिकारी बी. पी. कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात गाव निर्मल होण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने गतवर्षात केलेल्या कामकाजाची माहिती आणि सद्य:स्थिती सर्वांसमोर मांडली.यावेळी प्रकल्प संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, शौचालयासाठी बँका, पतसंस्था, सेवा सोसायट्या यांच्याकडून कर्जपुरवठा करावा. पंचायत समिती शिरोळचे गटविकास अधिकारी कुसूरकर यांनी निर्मलग्राम होण्याकरिता मनुष्यबळ, गवंडी प्रशिक्षण व इतर बाबींची पूर्तता करण्याची हमी दिली. यावेळी सभापती शीला पाटील, उपसभापती अनिता माने, अब्बास मदाक, चव्हाण उपस्थित होते.
निर्मलग्रामपासून अब्दुललाट दूरच
By admin | Updated: January 23, 2015 00:45 IST