दत्ता पाटील - तासगाव विकास कामांच्या श्रेयवादासाठी चढाओढ करणाऱ्या कारभाऱ्यांच्या गावातच हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र तासगाव तालुक्यात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उदासीन भूमिकेमुळे तालुक्यातील एकाही सदस्याचे गाव अद्यापपर्यंत हागणदारीमुक्त झालेले नाही. एवढेच नव्हे, तर आमदार आणि खासदारांच्या गावाचीही परिस्थिती निराशाजनकच आहे. तालुक्यातील केवळ तीन गावेच हागणदारीमुक्त झालेली आहेत. काही उदात्त हेतू समोर ठेवून आघाडी शासनाने हागणदारीमुक्त गाव योजना राबवली. पहिल्या टप्प्यात त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. सध्याच्या भाजप सरकारनेही त्यास प्रोत्साहन देत हागणदारीमुक्तीसाठी शौचालय उभारण्यासाठीच्या शासकीय अनुदानात वाढ केली आहे. यापूर्वी साडेचार हजार रूपये असणारे अनुदान आता बारा हजार रूपये करण्यात आले आहे. योजना प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी शासकीय स्तरावरून मोठी प्रसिध्दी देण्यात आली. परंतु ही योजना राबविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये मात्र कमालीची उदासीनता आहे. कोणत्याच सदस्याने पुढाकार घेतला नाही. काही काळ भरारी पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आला. महिन्या-दोन महिन्यानंतर पुन्हा ही मोहीम थंंडावली. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे हागणदारीमुक्त गावाला खीळ बसली. तालुक्यातून जिल्हा परिषदेचे सहा आणि पंचायत समितीचे १२ सदस्य प्रतिनिधीत्व करत आहते. कवठेएकंद, मणेराजुरी, सावळज या तीन गावातून एकाच गावात दोन प्रतिनिधी आहेत. मात्र यापैकी एकाही सदस्याचे गाव हागणदारीमुक्त झालेले नाही.तासगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. त्यापैकी केवळ तीनच गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीतून मिळणारा विकास निधी आपल्या मतदारसंघाला जास्त मिळावा, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ आपल्याच मतदार संघात मिळावा, यासाठी बहुतांश सदस्यांचा अट्टाहास चाललेला असतो. परंतु लोकांचे प्रबोधन करून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करताना मात्र हे सदस्य दिसून येत नाहीत.खासदार-आमदारांची गावेही मागेच...गाव निर्मल व्हावे, स्वच्छता राहावी, ग्रामजीवन एका विशिष्ट दर्जाचे बनावे, गावोगावी सुधारणांचे वारे पोहोचावे, या हेतूृने निर्मलग्राम योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तालुक्याचे नेते आर. आर. पाटील यांनी ग्रामविकासमंत्री असताना उभारलेल्या कामातूनच या योजनेची सुरूवात झाली. मात्र सध्या त्यांच्याच तालुक्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. हागणदारीमुक्त ग्राम योजनेत सदस्यांबरोबरच आमदार, खासदार यांच्या गावातही निराशाजनक कामगिरी आहे. आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी गावात १३७ कुटुंबांकडे, तर खासदार संजय पाटील यांच्या चिंंचणी गावात ६४९ कुटुंबांकडे अद्यापही शौचालय नाही. माजी समाजकल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्या छाया खरमाटे यांचा मतदारसंघ असणारे विसापूर हे गाव तर सर्वात पिछाडीवर असून, या गावात एकूण १ हजार ३१८ कुटुंबांपैकी अद्याप १ हजार २ कुटुंबांकडे शौचालय नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या गावात...जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवणाऱ्या जवळपास सर्वच नेत्यांच्या गावात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. चिंचणीत ६४९, अंजनीत १३७, बोरगाव-४४४, डोंगरसोनी-४९२, हातनूर-३०५, कवठेएकंद-१७४, मणेराजुरी-४३०, मांजर्डे-८३०, नागाव (नि.) -२१८, पेड-७३१, सावळज-६८२, सावर्डे-४१०, तुरची-१९७, विसापूर-१००२, वंजारवाडी-६२, तर येळावीतील ७१८ कुटुंबांकडे शौचालय नाही.गावापेक्षा वाडी सरस वाडीपेक्षा गावे सुधारलेली असतात, असा पूर्वापार समज आहे. मात्र हागणदारीमुक्त गावांची आकडेवारी पाहिल्यास ‘गावापेक्षा वाडी सरस’ असेच चित्र आहे. तालुक्यातील गोटेवाडी, कचरेवाडी, नागेवाडी या वाड्या हागणदारीमुक्त झालेल्या आहेत, तर इतरही वाड्यांवरील शौचालयांची टक्केवारीही गावांपेक्षा सरस आहे. त्यामुळे या वाड्यांचा आदर्श घेऊन गावेही हागणदारी मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतील, अशीही अपेक्षा आहे.
‘कारभाऱ्यां’च्या गावात ‘निर्मलग्राम’चा फज्जा
By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST