कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनादिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली (ता. राधानगरी)च्या नऊ शिक्षकसेवकांना काल, शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी सांगितले, महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली (ता. राधानगरी)च्या नऊ शिक्षकसेवकांनी थकीत वेतन मिळण्यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी बाटल्यांतून आणलेले रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना शाहूपुरी पोलिसांनी त्या शिक्षकसेवकांना ताब्यात घेतले. गर्दी करून ज्वालाग्रही पदार्थ जवळ बाळगून प्रतिबंधात्मक नोटिसांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. संशयित सूर्याजी रंगराव नाईक (वय ४६), दिनकर दत्तात्रय शिंदे (४३, दोघे रा. वडाचीवाडी, ता. राधानगरी), गणपती विश्वनाथ फल्ले (४९), गोविंद दिनकर चौधरी (३६), हॉलेस निकल्लू डिसोजा (४१, सर्व रा. गावठाण, आडोली, ता. राधानगरी), बाबासाहेब दिनकरराव देसाई (४८, रा. कडगाव, ता. भुदरगड), शामराव दत्तात्रय ढोकरे (४३, सावर्डे, ता. राधानगरी), पांडुरंग दत्तात्रय केसरकर (३७, रा. जळकेवाडी), निवृत्ती गोविंद मोरसकर (६०, रा. करडवाडी, ता. राधागनरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)
नऊ शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST