कोल्हापूर : नवतंत्रज्ञानामुळे भाषेतील करिअरचे दालन खुले झाले असून, विद्यार्थ्यांनी भाषेतील व्यावसायिक प्रवर्तक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे अभ्यागत अधिव्याख्याता डाॅ.हिमांशु स्मार्त यांनी गुरुवारी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रातर्फे आयोजित ‘उच्चशिक्षण आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावरील ऑनलाइन करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. त्यांनी ‘मराठी विषयातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानातील भाषेमुळे निर्माण होणाऱ्या संधीचा शोध घेणे आणि त्या दृष्टीने कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. भाषेचा अभ्यास साहित्य केंद्रित न करता, उद्योग आणि व्यावसायिकताभिमुख नवसंधीचा शोध घेण्यासाठी केला पाहिजे. स्मार्ट फोन, संगणक आणि वेब, यातील भाषेतून करिअर करणाऱ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. चित्रपट, टेलिव्हिजन, जाहिरात, अनुवाद, तंत्रज्ञान, वृत्तपत्रे, रेडिओ, सूत्रसंचालन आणि व्हॉइस अर्टिस्ट या क्षेत्रात भाषा विषयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी असल्याचे डॉ.हिमांशु स्मार्त यांनी सांगितले. दूरशिक्षण केंद्राचे समन्वयक डाॅ.नितीन रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. डाॅ.पी.एन. देवळी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डाॅ.के.बी. पाटील यांनी आभार मानले.