दिलीप चरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय परिसरातील कोरोना रुग्णसेवेसाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयात कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट, समर्पित कोविड सेंटर व लसीकरण सेवेसाठी सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय अधीक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व आरोग्य सेवक कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात पंचक्रोशीतील गरिबांच्या रुग्णसेवेचे हे केंद्र आशादायक ठरत आहे.
हातकणंगले तालुक्याच्या पश्चिम विभागातील पारगाव परिसरातील वीस गावांतील गोरगरिबांच्या रुग्णसेवेसाठी सुमारे तीस वर्षे हे शासकीय रुग्णालय तत्पर सेवा देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून या रुग्णालयात कोरोना उपचार सेवा सुरू केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत आरोग्य सेवक गेली चौदा महिने सेवेत व्यस्त आहेत.
रुग्णालयात रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाते. आतापर्यंत १२४२ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली. त्यापैकी ३८३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णालयात समर्पित कोविड सेंटर सुरू केले असून २८ खाटांवर सेवा दिली जात आहे. १५ खाट ऑक्सिजनयुक्त आहेत. कोरोनावरील औषधे येथून दिली जातात. लसीकरण केंद्र सुरू असून आतापर्यंत २२७ जणांना कोव्हॅक्सिन तर ३००८ जणांना कोविशिल्ड असे एकूण ३२३५ जणांचे लसीकरण केले आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम.जी. जमादार हे रुग्णालयाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. डॉ. बी.एस. लाटवडेकर, डॉ. ज्योती कांबळे, डॉ.अमोल नरदे, डॉ.शोएब पटेल, डॉ.रिईसा शिकलगार वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ज्येष्ठ परिचारिका मनीषा शिंदे यांच्यासह सहा परिचारिका व पाच चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णवाहिका चालक विलास शिंदे हे ऑक्सिजन सिलिंडर आणणे, औषधे व लस आणण्यासाठी अहोरात्र पारगाव ते कोल्हापूर वाटेवर धावपळ करीत आहेत.
२७ पारगााव
फोटो ओळी : नवे पारगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेत कार्यरत अधीक्षक डॉ. एम.जी. जमादार यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी.