आता हा समारंभ शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षण उपसंचालक सोनवणे आणि प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर यांच्या हस्ते व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळचे वैशिष्ट्य हे की, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे हे सर्व नूतन मुख्याध्यापकांच्या शाळांना पुस्तकांचा संच भेट देणार आहेत. एकशे पंचवीस नूतन मुख्याध्यापकांना एक हजार पुस्तके ते आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत यावेळी भेट देणार आहेत. या संचात महात्मा गांधीजींची माझी आत्मकथा, श्यामची आई, हसत-खेळत संविधान, शिवाजी कोण होता, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती इ.सह सात वाचनीय पुस्तकांचा समावेश आहे. गेली सोळा वर्षे ग्रंथदान उपक्रमात सातत्य ठेवणाऱ्या प्राचार्य जीवन साळोखे यांनी कोरोनाच्या संकटकाळातही सर्व खबरदारी घेत आपला एकहाती ग्रंथदान उपक्रम सुरूच ठेवला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आपल्या ग्रंथदानाची दस हजारी साजरी करीत आहेत, हे वैशिष्ट्य आहे. दरम्यान, गुढीपाडव्यापासून यावर्षी जीवन साळोखे यांनी वाचकांना ‘वाचते’ करण्यासाठी शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी, डाॅक्टर्स, वकील इ. सह समाजातील अनेक घटकांना दररोज पुस्तके वाटणे सुरूच ठेवले आहे.
जिल्ह्यातील नूतन मुख्याध्यापकांना ग्रंथ संचाची भेट मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST