लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणास सुरुवात केली आहे. शहर व परिसरात शासकीय आरोग्य केंद्रांवर तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. सध्या केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शहर व परिसरात २१ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. सुरुवातीस नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु सध्या नागरिकांची लसीकरणासाठी संख्या वाढत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
काही केंद्रांवर गर्दीचे प्रमाण कमी असले, तरी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सच्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. तसेच केंद्रावर कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यावेळी होणारी गर्दी पाहता नेटके नियोजन प्रशासनाने करणे आवश्यक आहे; अन्यथा कोरोना रुग्ण संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
फोटो ओळी
२६१२२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजी येथील शासकीय आरोग्य केंद्राबाहेर सोशल डिस्टन्स न पाळता नागरिक बसले होते.
२६१२२०२१-आयसीएच-०४
शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करता नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
सर्व छाया-उत्तम पाटील