कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ सोमवारी जिल्ह्यात पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.
सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केले. यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहातच सोमय्या यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील म्हणाले, आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करून सरकार पाडण्याचा डाव भाजपचा आहे. मात्र ही मंडळी सत्तेचा कितीही वापर करू देत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार हलणार नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप द्वेषातून केले आहेत. गेली २०-२५ वर्षे मुश्रीफ यांनी सामान्य माणसाची जी सेवा करून जी पुण्याई कमावली, ती आशा आरोपांना भीक घालणार नाही. या आरोपातून काहीही सिद्ध होणार नसून सोमय्यांसह भाजप तोंडावर पडेल.
शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभैर झाले असून, ते चुकीचे आरोप करत सुटले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांचे आयुष्य खुले किताब आहे, त्यामुळे कोणी कितीही आरोप केले तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.
माजी स्थायी सभापती राजेश लाटकर यांनीही भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी आमदार राजीव आवळे, विलास गाताडे, आदिल फरास, आसिफ फरास आदी उपस्थित होते.
करवीर राष्ट्रवादीतर्फे निषेध
करवीर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे किरीट सोमय्यांच्या आरोपाचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे श्रावणबाळ आहेत, त्यांच्यावर केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही. भाजप नेते किती त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरची जनता मुश्रीफ यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, अमोल कुंभार, आकाश भास्कर, युवराज पाटील, पंडित कळके, नंदकुमार खाडे, सुनील पाटील, सागर डकरे, मयूर जांभळे आदी उपस्थित होते.