पाचगाव : शहरापासून जवळच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या प्रभाग क्र ६७, रामानंदनगर-जरगनगर हा प्रभाग यावेळी अनुसुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक इच्छुकांची दांडी गुल झाली आहे. मात्र, आपल्याच समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी अनेकांनी कंबर कसल्याचे चित्र आहे. सध्या या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षांसमोर पेच निर्माण होणार आहे. २००० मध्ये या प्रभागातून दिनकर पाटील यांनी प्रतिनिधित्व केले, २००५ मध्ये देविका जरग या निवडून आल्या होत्या तर २०१० मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेणाऱ्या सुनील पाटील यांनी सलग १० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना उपमहापौरपदही भूषविले होते. यंदा आरक्षणामुळे त्यांची संधी हुकली आहे. सध्या हा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथून भाजप-ताराराणी आघाडीकडून सुनीता घोडके इच्छुक आहेत. काँग्रेसकडून वृषाली कदम व सतीश भाले यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे. सिंधू शिरोळे, अर्चना चौगुले, प्रियांका कांबळे, पूजा भोपळे यांनीही या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. सर्वच इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर भर दिल्याने या प्रभागात निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. इच्छुकांची संख्या पाहता येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातच सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
सुनील पाटील : (राष्ट्रवादी) १२९८
प्रशांत पवार : (भाजप) ११५९
संदीप कदम : (काँग्रेस) ८४७
संजय पाटील : (शिवसेना) ३१६
प्रभाग क्र ६७,रामानंदनगर-जरगनगर,आरक्षण अनुसूचित जाती महिला
विद्यमान नगरसेवक : सुनील पाटील,राष्ट्रवादी
कोट
गेल्या पाच वर्षांत प्रभागात एक कोटीच्या वर अनेक विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. हा प्रभाग टँकरमुक्त केला आहे. प्रभगाताील रस्ते, गटर्स,पाईपलाईन, ओढ्यावरील पूल अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. सुनील पाटील, विद्यमान नगरसेवक, राष्ट्रवादी
सोडवलेले प्रश्न:
बहुतांश रस्त्याची कामे मार्गी, प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, ओढ्यावरील पूल, हॉलचे बांधकाम, एलइडी लाईट.
प्रभागातील समस्या: प्रभागात अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो.
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी वेळेवर मिळत नाही. वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो. रामानंदनगर ओढ्यापासून मुख्य रस्त्याला बाजूपट्ट्या नसल्याने वाहतूक कोंडी होते.
ओढ्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात पूर आला की अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसते. नागरी सुविधा केंद्र नसल्याने लोकांना शहरात जावे लागते. अंगणवाड्यांची दुरावस्था आहे.
फोटो : प्रभाग क्रमांक ६७ रामानंदनगर
ओळ : जाधव पार्क येथे गटर्सची दुरावस्था झाल्याने गटारमधील पाणी इतरत्र पसरते व त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या प्रभागात अनेक ठिकाणी अशीच समस्या आहे.