कोल्हापूर : शोषितांसाठी अखेरपर्यंत लढणारा नेता म्हणून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची ओळख होती. सर्वसामान्यांसाठी ते शेवटपर्यंत लढले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने लढणारा झुंजार नेता गमावला आहे. त्यांनी आपल्यासमोर ठेवलेल्या कामाचा आदर्श आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे, असे मत गुरुवारी महापौर तृप्ती माळवी यांनी व्यक्त केले.माजी खासदार मंडलिक यांच्या निधनानिमित्त सायंकाळी महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माळवी बोलत होत्या. प्रारंभी महापौर माळवी यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.तृप्ती माळवी म्हणाल्या, मंडलिक यांनी आपले आयुष्य उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी खर्ची घातले. ते विद्यार्थिदशेपासूनच विविध आंदोलनांत सक्रिय असल्याने ‘लढवय्या’ अशी त्यांची ख्याती होती. आमदार व खासदार म्हणून ते चारवेळा निवडून आल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात कसा यशस्वी होऊ शकतो, याचे ते उत्तम उदाहरण होते.नगरसेवक आर. डी. पाटील यांनी, मंडलिकांचे जीवन हे संघर्षमय होते. तळागाळात राबणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती, असे त्यांनी सांगितले. सुभाष रामुगडे म्हणाले, पंचगंगा नदी येथील शिवाजी पुलाजवळील सुरू असलेल्या नवीन पुलासाठी सदाशिवराव मंडलिक यांनी पाठपुरावा करून निधी आणला. त्यामुळे नवीन पुलाला सदाशिवराव मंडलिक यांचे नाव द्यावे. सत्यजित कदम म्हणाले, शिवाजी पुलाजवळील नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलाला सदाशिवराव मंडलिक यांचे नाव देण्याचा ठराव महासभेत करावा. यावेळी माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, बजरंग शेलार यांची भाषणे झाली.शोकसभेला नगरसेवक महेश कदम, प्रकाश नाईकनवरे, भूपाल शेटे, नगरसेविका माधुरी नकाते यांच्यासह मदन चोडणकर, किरण पडवळ, किरण नकाते, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)बहुतांश नगरसेवकांची पाठमहापौर माळवी यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते; पण तब्बल अडीच तासांनी ती सुरू झाली. माळवी यांनी केलेल्या आवाहनाला काही मोजक्याच नगरसेवकांनी उपस्थित दर्शविली; तर बहुतांश नगरसेवक-नगरसेविकांनी याकडे पाठ फिरवली होती.
शिवाजी पुलाला मंडलिक यांचे नाव द्यावे
By admin | Updated: March 12, 2015 23:50 IST