कोल्हापूर : शहरातील नाले सफाई व नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. जयंती, दुधाळी नाल्यासह एकूण ४७६ लहान नाले व २३६ मध्यम नाल्याची ही सफाई करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलेन, जेसीबीच्या व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कळंबा जेल मागील योगेश्वरी कॉलनी येथील ओढ्यातील गाळ पोकलेनच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सर्वच लहान व मोठ्या नाल्यांची व चॅनल सफाई तसेच जयंती, गोमती, दुधाळी व श्याम सोसायटी नाला पोकलेन मशीनच्या साहाय्याने गाळ काढण्यात येणार आहे. त्यासाठी चार पोकलेन मशीन भाड्याने घेतली आहे.
आतापर्यंत योगेश्वरी कॉलनी ते हुतात्मा पार्क, राजेंद्रनगर ते हुतात्मा पार्क, रिलायन्स मॉल ते हुतात्मा पार्क व शाहू सोसायटी ते मनोरमा नगर येथील गाळ काढण्याचे व सफाई करण्याचे काम पूर्ण झाले. त्याचबरोबर चॅनेल सफाईसाठी महापालिकेचा एक जेसीबी व ४० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. ३४ प्रभागामधील चॅनेल सफाईची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरित सर्व मोठे नाले तसेच इतर स्वरूपाचे सर्व चॅनल्स यांची स्वच्छता ३० मे अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
शहरातील सर्व नागरिकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नयेत, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.
फोटो क्रमांक - ०६०५२०२१-कोल-केएमसी
ओळी - कोल्हापूर शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची स्वच्छता तसेच त्यातील गाळ काढण्याच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. ३० मेपूर्वी संपूर्ण काम संपवायचे आहे.