साके : बाचणी (ता. कागल) येथे अंगावर उच्च दाबाची विद्युत वाहिनीची तार खांबावरून तुटून पडल्याने विजेचा धक्का लागून माय-लेकराचा मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय ३२) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय १४) असे मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत भक्ती गौतम जाधव ही बारा वर्षांची मुलगी बचावली.
याबाबत अधिक माहिती अशी, गेले दोन दिवस नळास पाणी न आल्याने गीता जाधव आपल्या दोन मुलांसह मंगळवारी (२०) रोजी सकाळी १० वाजता घराच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे कपडे धुण्यास गेल्या होत्या. उसाच्या शेतातून माघारी परतत असताना विजेची उच्च दाबाची विद्युत खांबावरील प्रवाहित तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. याचवेळी आईला वाचविण्यास गेलेला मुलगा हर्षवर्धन जाधव याला जोराचा धक्का बसल्याने माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने पुढे असणारी बारा वर्षांची मुलगी गौरी घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्याने बचावली. मुलगा व पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माय-लेकरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणकडून संबंधित कुटुंबाला अंत्यविधीसाठी तातडीची मदत दिली आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून, घटनास्थळी कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे करत आहेत. घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी. ए. उदगावे, कनिष्ठ अभियंता एस. एस. निकम, सहा. अभियंता ए. डी. आंबवडे, सरपंच इक्बाल नायकवडी, उत्तम पाटील, पंडित कुंभार, दत्ता जाधव, पोलीस पाटील नामदेव परीट आदी उपस्थित होते.