राम मगदूम -- गडहिंग्लज नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांचे सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भक्कम आघाडी साकारण्यासाठी ‘गडहिंग्लज’सह जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना, स्वाभिमानीसह प्रकाश चव्हाण व डॉ. प्रकाश शहापूरकर गट यावेळी एकत्र येण्याची शक्यता आहे.गतनिवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीच्या पाडावासाठी बाबासाहेब कुपेकर, हसन मुश्रीफ व शहापूरकर हे तिघेही एकत्र आले. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी’ पॅनेलने १७ पैकी ९ जागा जिंकून पालिका ताब्यात घेतली, तर जनतादल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले.दरम्यान, साडेतीन वर्षांनंतर ‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावर यांच्या पाठिंब्याने जनता दलाने वर्षापूर्वीच पुन्हा पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व जनता दलाची युती झाली. परंतु, नगरपालिकेत त्यांची एकमेकांच्या विरोधकाची भूमिका कायम राहिली आहे.नगरपालिकेची सत्ता मिळवून देऊनही आपल्या कार्यकर्त्यांना ती टिकवता आली नाही. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गडहिंग्लज शहरात ‘राष्ट्रवादी’ला कमी मते मिळाल्यानेच मुश्रीफांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ‘जनता दला’शी मैत्री केली आहे. मात्र, ही युती नगरपालिकेत कायम राहणार की दोघेही स्वतंत्र लढणार? याबाबत अद्याप कोणतेही संकेत नाहीत. ‘नाराज’ मंडळींवर ‘नजर’ !गडहिंग्लज कारखान्यात शिंदे-मुश्रीफ एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली नाराजी अजूनही कायम आहे. त्यामुळे काही ‘नाराज’ मंडळी आपल्या हाताला लागतात का? या दृष्टीनेही ‘महाआघाडी’ प्रयत्नशील आहे.कोल्हापुरात झाली बैठकअलीकडेच कोल्हापूर येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील व गडहिंग्लज तालुक्यातील मुश्रीफ विरोधकांची बैठक झाली. त्या बैठकीत गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेसंबंधी चर्चा झाल्याचे समजते.आत्मविश्वास दुणावलागडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे व मुश्रीफ एकत्र आल्यानंतर शहापूरकरांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत चव्हाणदेखील सामील झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आघाडीला ‘ताकद’ दिली. सत्तेपर्यंत पोहोचता आले नसले तरी त्यांचा आत्मविश्वास दुणावल्यामुळेच गडहिंग्लज पालिकेसाठीही त्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
मुश्रीफविरोधक एकत्र येणार ?
By admin | Updated: June 13, 2016 00:13 IST