सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील करण अनिल खेडकर (वय १७) या तरुणाच्या झालेल्या खूनप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला रिक्षाचालक अरुण शिवाजी माळी (२६, रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, कवलापूर) यास शुक्रवारी संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्यानेच करणचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. करणचा खून करण्यासाठी वापरलेला बांबू व दोरी सायंकाळी जप्त करण्यात आली. करणच्या नात्यातील एका महिलेशी अरुणचे अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. या महिलेशी अरुणची जवळीक वाढल्याने तो तिच्याशी सातत्याने मोबाईलवर बोलत असे; तसेच घरी भेटायलाही जात असे. हा प्रकार करणच्या लक्षात आल्याने, त्याने अरुणला ‘तू आमच्या नात्यातील महिलेकडे का येतोस?, तू तिच्याशी मोबाईलवर का बोलतोस?’, असा जाब विचारला होता. यातून दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. अनैतिक संबंधात करण अडसर ठरत असल्याचे लक्षात येताच अरुणने त्याची ‘गेम’ करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार २१ जुलैला त्याने करणला महादेव तालमीमध्ये बोलावून घेतले. प्रथम त्याच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. यामध्ये तो रक्तबंबाळ होऊन जखमी होताच, अरुणने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तालमीला कुलूप लावून त्याने पलायन केले होते. करणच्या खुनात सध्या तरी केवळ अरुण माळी याचाच हात असल्याचे निष्पन्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित माळी सांगली-कवलापूर मार्गावर सहाआसनी रिक्षावर चालक म्हणून काम करतो. घटनेदिवशी तो रिक्षा चालवित होता. दुपारी तीननंतर त्याने रिक्षा चालविणे बंद केले होते. त्यानंतर एका मोटारीतून तो फिरत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यादिवशी महादेव तालमीमध्ये काही पैलवानांनी जेवणाचा बेत आखला होता. यासाठी ते तालमीमध्ये आले होते, पण तालमीस कुलूप होते. त्यांनी अरुणशी संपर्क साधून, तालमीची चावी देण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपल्याकडे नसल्याचे सांगितले. तालमीजवळ असलेल्या महादेव मंदिरामध्येही तो सायंकाळी आरतीला गेला होता. मंदिरातील गर्दी कमी झाल्यानंतर व पुजारी गेल्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, अशी माहिती तपासातून पुढे येत आहे. त्याने खून कधी केला, याविषयी त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर अरुणने गावातून पलायन केले होते. त्यास कऱ्हाड (जि. सातारा) येथे पकडण्यात यश आले होते. चौकशीत त्याने करणचा डोक्यात बांबू घालून व दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यास अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्यास न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सायंकाळी संजयनगर पोलिसांचे पथक तपासासाठी कवलापुरात गेले होते. अरुणने खुनानंतर लपवून ठेवलेला लाकडी बांबू व गळा आवळण्यासाठी वापरलेली दोरी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)एकाचाच सहभागसध्या तरी अरुण माळी या एकाच संशयिताचा खुनात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीतून कोणाचे नाव निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.महादेव तालमीला सील ठोकलेअरुणने करणचा खून महादेव तालमीत केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री तालमीला भेट देऊन पाहणी केली. रक्ताचे डाग व अन्य काही महत्त्वाचे पुरावे मिळतात का, याची तपासणी केली. त्यानंतर तालमीला सील ठोकले. खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कोणाची मोटार वापरली, रक्ताचे डाग पडलेले कपडे कोठे बदलले, खुनानंतर तो कोठे आश्रयाला गेला होता, याबाबत चौकशी केली जात आहे. क्षुल्लक कारणावरून करण खेडकर या तरुणाचा बळी गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तरुणाचा खून कवलापूरच्या तालमीतच
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST