कोल्हापूर : जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक मुरलीधर जाधव यांना पाच वर्षांसाठी खंडून देण्यात आलेले महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद आता धोक्यात आले आहे. काल, रविवारी झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीतील निकालाने जाधव यांना या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. जनसुराज्य पक्षाच्या नगरसेविका आशा महेश बराले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत माधुरी किरण नकाते या विजयी झाल्या. नकाते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात जनसुराज्य पक्षाच्या शशिकला बराले निवडणुकीत उभ्या होत्या. जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याचे निधन झाल्यामुळे सभागृहातील या आघाडीचे संख्याबळ आता दहावरून नऊ झाले आहे. महापालिका सभागृहात शिवसेना-भाजप आघाडीची सदस्यसंख्या नऊ आहे. त्यामुळे माधुरी किरण नकाते यांनी जर या आघाडीला पाठिंबा दिला, तर आघाडीचे संख्याबळ दहा होईल. ‘जनसुराज्य’च्या विरोधात निवडणूक लढलेल्या माधुरी नकाते या याच आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे म्हणूनच जर असे झाल्यास शिवसेना-भाजप आघाडी संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगू शकते. महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आॅक्टोबर २०१० मध्ये प्रा. जयंत पाटील यांनी दहा नगरसेवकांची जनसुराज्य आघाडी तयार करून विरोधी पक्षनेतेपद पाच वर्षांसाठी मुरलीधर जाधव यांना द्यायचा निर्णय घेतला होता. परंतु, आता ही आघाडीच अल्पमतात येणार असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
मुरलीधर जाधव यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात ?
By admin | Updated: July 1, 2014 00:56 IST