कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा राज्य सरकारने जरी निर्णय घेतला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही. महापालिकेची निवडणूक ठरलेल्या मुदतीतच होईल, त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या निवडणुकीचा कार्यक्रम १० सप्टेंबरनंतर केव्हाही सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेची आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक आणि सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया कोल्हापुरात आले होते. त्यांनी संयुक्त बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी माहिती दिली. सहारिया म्हणाले, ‘महानगरपालिकेची मुदत १५ नोव्हेंबरला संपत असून तत्पूर्वी किमान दहा दिवस अगोदर नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर किमान सहा आठवडे हा कार्यक्रम आम्हांला सुरू करावा लागेल. तो विचार करून आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करीत आहोत. या निवडणुकीची महापालिका व निवडणूक आयोग यांच्यापातळीवरील तयारी सध्या वेगात सुरू आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल १० सप्टेंबरनंतर !
By admin | Updated: July 21, 2015 01:54 IST