कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून लोकसहभागातून पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र या घाटासंबंधीची महापालिकेची प्रचंड अनास्था दिसून येत आहे. गाळ काढण्यासाठी अपुरे मनुष्यबळ, अपुरी साधनसामग्री आणि ढासळलेल्या मंदिराची ‘जैसे थे’ स्थिती आहे. दुसरीकडे आज, शनिवारी या गाळ काढण्याच्या कामात शहरातील विविध संस्थांनी हातभार लावल्याने गाळ काढण्याच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान, आज या गाळात दोन तुळशीवृंदावन व एक चौथरा आढळून आला. छत्रपती घराण्याची समाधी मंदिरे आणि अन्य देवतांची मंदिरे असलेल्या पंचगंगा घाटाची स्वच्छता वेगाने केली जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत थोडी वाढ झाल्याने पात्राबाहेर आलेल्या काही मंदिरांचा तळाचा काही भाग पुन्हा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, आज काढलेल्या गाळामुळे समाधी मंदिरांच्या तळातील दगडी बांधकामावरील कोरीव काम, पायऱ्या, त्यासमोरील दोन तुळशी वृंदावन आणि चौथरा आढळून आला. पाऊस सुरू होण्याआधी घाटावरील गाळ काढणे गरजेचे आहे, असे अभ्यासकांनी वारंवार सांगितल्यानंतरही महापालिकेने संपूर्ण यंत्रणा अद्यापही या स्वच्छता कामासाठी लावलेली नाही. येथे सध्या महापालिकेचे फक्त दहा कर्मचारी आहे. एक जेसीबी आणि एक डंपर देण्यात आला आहे. गाळ पात्राबाहेरच टाकण्यावर आक्षेप व्यक्त केल्यानंतर तो पेरूच्या बागेत आणि शिवाजी पुलाच्या पुढे टाकण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेची अनास्था, लोकसहभागातून स्वच्छता
By admin | Updated: July 6, 2014 00:13 IST