कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे व गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर यांची वर्णी लागली आहे. काल, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्याच मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या कोट्यातील अध्यक्षपदाची नियुक्ती करता आलेली नाही. या पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असून, कुणाला दुखवायला नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे पदच रिक्त ठेवणे पसंत केले.देवस्थान समितीची कार्यकारिणी एकूण सहा सदस्यांची असते. त्यापैकी तीन सदस्य राष्ट्रवादीचे, तर तीन सदस्य काँग्रेसचे असतात. याशिवाय अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीच्या पद्मजा तिवले व बाळासाहेब कुपेकर यांची सदस्यत्वाची मुदत संपल्यामुळे गेले वर्षभर हे पद रिक्त होते. सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी बी. एन. पाटील-मुगळीकर, संगीता खाडे आणि उदयानी साळुंखे यांनी ताकद लावली होती. मुगळीकर हे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यामुळे त्यांना हे पद मिळावे यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर आग्रही होत्या. खाडे या राष्ट्रवादीच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, पवार कुटुंबीयांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पदरात अखेर देवस्थानच्या सदस्यत्वाचा प्रसाद पडला.या निवडीनंतर आता देवस्थान समितीच्या सदस्यांची संख्या पाच झाली असून, काँग्रेसच्या वाट्याचे सदस्यपद आणि अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्षपदासाठी अॅड. सुरेश कुराडे, माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे आणि संजय डी. पाटील इच्छुक आहेत, परंतु या निवडीतून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानला अध्यक्ष देणेच टाळले आहे. (प्रतिनिधी)
मुगळीकर, संगीता खाडे यांना ‘देवस्थान’चा प्रसाद
By admin | Updated: September 3, 2014 00:29 IST