कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या बहुजन समाजातील अनेक नायकांचा उल्लेख इतिहासात आढळत नाही. या उपेक्षित नायकांना प्रकाशात आणण्यासाठी इतिहासाचा पुनर्विचार आणि पुनर्लेखन करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. डॉ. नारायण भोसले यांनी केले. येथील शहाजी महाविद्यालयात ‘पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ : पुनर्विचार व पुनर्लेखन’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. भोसले म्हणाले, कोणताही इतिहास स्थिर नसतो. इतिहास लिहणाऱ्यांचा धर्म, जात, पंथ आणि प्रदेश यांचाही इतिहास लेखनावर प्रभाव पडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले यांची प्रतिमा कधीही राष्ट्रवादी म्हणून समोर आणली गेली नाही. इतिहास हा केवळ विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट समूहांभोवतीच केंद्रित राहिला. त्यामुळे इतिहासाबाबत ज्या ज्या नवीन गोष्टी आणि पुरावे समोर येत आहेत, त्यांच्या आधारे इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे डॉ. अवनीश पाटील म्हणाले, इतिहास लिहिताना जबाबदारीचे भानही इतिहास लेखकांनी जपले पाहिजे. ऐतिहासिक संदर्भांची दुसरी बाजूही तपासली पाहिजे. यावेळी पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीची सखोल माहिती दिली. या चर्चासत्रात ८० संशोधकांनी विविध विषयांवरील इतिहासावरील ८० शोधनिबंध सादर केले. संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत बोंद्रे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डी. आर. मोरे, उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मदन बोडके, रवींद्र भोसले, तसेच इतिहास विभागाचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते. सुरेश शिखरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. डॉ. सरोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राज बिरजे यांनी आभार मानले.
इतिहासाचे विविधांगी पुनर्लेखन गरजेचे
By admin | Updated: March 16, 2015 00:04 IST