मलकापूर : देशातील सर्वसामान्य नागरिकांना रेशनचे धान्य शासनाने दिले पाहिजे. महाराष्ट्रात पंधरा लाख नागरिकांचे नवीन कार्डासाठी फॉर्म भरले आहेत. एक महिन्यात आम्हाला कार्ड मिळाले नाही, तर १५ सप्टेंबर रोजी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लोकशासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिला.शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर आज, बुधवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.कोळसे-पाटील म्हणाले, गरिबांच्या जिवावर देश चालत आहे. भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांना पिवळे रेशन कार्ड मिळाले पाहिजे. केंद्र शासनाने राज्य शासनाला आठ लाख ५० हजार टन धान्य वितरित केले आहे. तलाठी व अधिकाऱ्यांनी तातडीने जनतेला पिवळे रेशनकार्ड वितरित करावे.अशोक नाईकवडी म्हणाले, शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. सतरा वर्षे झाली, तरी तहसील कार्यालयाने जनतेला नवीन कार्ड वितरित केलेली नाही. तलाठी, मंडल अधिकारी घरात बसून खोटे रिपोर्ट तयार करतात, असा आरोप त्यांनी केला.यावेळी बाळासाहेब कांबळे, मारुती जाधव यांची भाषणे झाली. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी निवेदन स्वीकारले. तालुक्यातील जनतेने नवीन अर्ज दाखल करतेवेळी आपल्या कागदपत्रांचे पुरावे सादर करावेत. यावेळी सर्वांना पिवळे कार्ड देण्याचे आश्वासन शेळके यांनी दिले. मेळाव्यास राजाराम पोवार, सर्जेराव पाटील, राजाराम सूर्यवंशी, माणिक बोटांगळे, शामराव पाटील, राम पाटील, आबाजी पाटील, आदींसह लोकशासन पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पिवळया शिधापत्रिकासाठी आंदोलन
By admin | Updated: August 13, 2014 23:30 IST