जगदीश कोष्टी / सातारा एसटी बसस्थानकात गेल्याबरोबर ‘चला गरमा-गरम ताजा वडा...’ अशी आरोळी कानावर पडली की, झोपलेले प्रवाशी जागे होतात. पोटात कावळे ओरडायला लागलेले असल्यामुळे वडापाव घेतला जातो. पण आता खरी झोप उडणार आहे, कारण अनेक बसस्थानकांमध्ये सकाळी बनविलेले वडे रात्रीपर्यंत वारंवार त्याच गरम तेलात गरम करून विकले जात आहेत. असे वडे आरोग्यासाठी हानीकारक आहेत. अन्न व भेसळ विभागाच्या पथकाने तांत्रिक मुद्यांवरुन जिल्ह्यातील बारा एसटी उपहार गृहावर कारवाई केली आहे. बदलत्या काळानुसार माणसांचा स्वभाव, मानसिकता बदलली आहे. पूर्वीच्या काळी गावी जायचे म्हटले की, चांगल्या दहा-बारा चपात्या, बटाट्याची भाजी बांधून नेण्याची पद्धत होती. गाड्यांमध्ये शिदोरी सोडून जेवत असताना पाहायला मिळत होते. मात्र, आता लोकांना ओझं न्यायचं नाही. दर पन्नास किलोमीटरवर मोठे बसस्थानक आहे. त्याठिकाणी एसटीची उपहारगृहे आहेत. महामार्गावर एसटीने कोणत्याही खासगी हॉटेलला परवाने दिलेले नसतानाही ढाब्यांवर हमखास बस उभी केली जाते. त्यामुळे प्रवाशी बाहेरचं खाणं पसंत करतात. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील नऊ एसटी उपहार गृहांची पाहणी केली. अन्नपदार्थाच्या दर्जाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक हितासंबंधी विशेष काळजी घेतली गेली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये पावसाळ्यात चिखल, घाण पाणी आत येऊ नये म्हणून पायपुसणी टाकणे, तयार अन्न पदार्थावर माशा बसू नयेत, म्हणून तारेच्या जाळ्या बसविणे, पिण्याच्या पाण्याची टाकी कधी धुतली याची माहिती असलेले फलक लावणे या त्रुटी आढळल्या आहेत. यावरुन फलटण, खंडाळा आणि शिरवळ येथील एसटी कॅन्टीनचा परवाना निलंबित केला आहे. तर पाचगणी, महाबळेश्वर, पाचवड, उंब्रज येथील एसटी कॅन्टीन व काशीळ येथील स्नॅकबार, कुडाळ येथील आशा भुवन, एसटी कॅन्टीन, केळघर येथील विघ्नेश एसटी कॅन्टीन, वाई येथील ओम साई एसटी कॅन्टीन, भुर्इंज येथीळ महाराष्ट्र एसटी कॅन्टीन येथेही तपासणी केली. त्यातीळ नऊ उपहारगृह चालकांना प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्रूटी दूर करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर त्रूटी दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत. असंख्य चालकांची एसटी कॅन्टेनला नापसंती जिल्ह्यात सर्वच मोठे बसस्थानके एक तासांच्या आत येत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराने कोणत्याही खासगी हॉटेल्स, ढाबा व्यावसायिकांना परवाने दिलेले नाहीत. किंवा चालक-वाहकांना अधिकृत थांबण्यासंबंधी परवानगी दिलेली नाही. मात्र शिरवळ ते कराड हद्दीतील डझनावरील हॉटेल्सवर एसटी गाड्या जेवणासाठी थांबलेल्या असतात. यासंबंधी वाहकही एसटीत प्रवासी बसण्यापूर्वीच निसंकोषपणे सांगत असतात. त्यामुळे अधिकृत एसटी कॅन्टीन चालकांच्या व्यावसायावर परिणाम होत असतो. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची ओरड कॅन्टेन चालकांतून होत आहे. आगारातील उपहारगृहातील अन्नाचा दर्जा कसा आहे, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापक किंवा स्थानक प्रमुखाची आहे. मात्र, त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनांवरुन स्पष्ट होत आहे.
सकाळचा वडा दुपारी अन् रात्रीही गरम!
By admin | Updated: July 12, 2015 00:35 IST