लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ बचाव मंच’च्या माध्यमातून गेली पाच-सहा वर्षे सत्तारूढ गटाविरोधात रान उठवणारे विजयसिंह माेरे, बाळासाहेब कुपेकर, किशोर पाटील यांच्यासह सहा शिलेदार सत्तारूढ गटाच्या छावणीत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांची शनिवारी भेट घेतली असून त्यापैकी दोघांना उमेदवारीची मागणीही केली आहे. मात्र, तुम्हाला येण्यास फार उशीर झाला, आताच जागेबाबत काही सांगू शकत नाही, चर्चा करून आपणास सांगतो, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी मागील निवडणुकीत ‘गोकुळ’मध्ये प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकून आव्हान निर्माण केले. पराभूत हाेणार हे माहिती असतानाही मंत्री पाटील यांना अनेकांनी साथ दिली. नवीन चेहरे आणि आक्रमक यंत्रणेच्या बळावर विरोधी आघाडीच्या अनेक जागा विजयाच्या जवळ पोहचल्या होत्या. त्यामुळे या पॅनेलमधील पराभूत उमेदवारांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला हाेता. गेली सहा वर्षे मल्टीस्टेट, वासाचे दुधासह इतर प्रश्नात हे सर्व जण मंत्री पाटील यांच्यासोबत होते. पाच वर्षे सत्तारूढ गटाविरोधात संघर्ष केला, किंबहुना ‘गोकुळ’ निवडणुकीतील विरोधी पॅनलचे उमेदवार म्हणूनच अनेक जण संस्थांच्या संपर्कात होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्व जण प्रचारातही पुढे होते.
मात्र पॅनल बांधणीत ‘गोकुळ बचाव’ म्हणून काम करणाऱ्यांपैकी बहुतांशी जणांना संधी मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच शुक्रवारी विजयसिंह माेरे, बाळासाहेब कुपेकर, किशोर पाटील यांच्यासह बचाव मंचच्या सहा जणांनी सत्तारूढ गटाच्या राधानगरी तालुक्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन आमच्यापैकी दोघांना उमेदवारी द्या, अशी मागणी केली. त्यानंतर शनिवारी या सगळ्यांनी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेतली, मात्र फार उशीर झाला, आताच काही सांगू शकत नाही, तुम्ही सगळे सोबत राहा, पुढे तुमचा सन्मान केला जाईल, असे पाटील यांनी सांगितल्याचे समजते.
‘शेकाप’ही संपर्कात
शेतकरी कामगार पक्षाला राजर्षी शाहू आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळेच पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने थेट राधानगरी तालुक्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन सत्तारूढ पॅनलमधून संधी देण्याची मागणी केली. यावर उद्या (रविवारी) चर्चा होणार आहे.
राधानगरीतील जागेबाबत रात्री उशिरापर्यंत खलबते
सत्तारूढ गटाकडून राधानगरी तालुक्यातील तीन जागा जवळपास निश्चित आहेत. मात्र, ऐनवेळी बचाव मंचाकडून सहा-सात जण आल्याने त्यातील एका नावाबाबत चर्चा सुरू झाली. याबाबत सत्तारूढ गटाच्या नेत्यांमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
‘बचाव’ला जागा देऊन हवा काढण्याचा प्रयत्न
गेली सहा वर्षे गोकुळ बचाव मंचच्या माध्यमातून काम करणाऱ्यांपैकी एकाला संधी देऊन विरोधी आघाडीची हवा काढण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाकडून सुरू आहे.